नवी दिल्ली /ऑनलाईन काव्यशिल्प: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्कारांची आज (गुरुवार) घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अभय बंग, राणी बंग यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात बंग दाम्पत्यालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्षे गडचिरोलीतील दुर्गम भागांत वैद्यकीय सेवा देणाऱ्या या दाम्पत्याचा हा उचित सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. अभय बंग यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तीन विषयांत सुवर्णपदक मिळवल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणात त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातही सुवर्णपदक मिळवले. शहरातील ऐशो आराम आणि भौतिक सुखांचा त्याग करून त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात आपले कार्यक्षेत्र निवडले.
डॉ. राणी चारी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर पती-पत्नी दोघांनी गडचिरोलीत समाजकार्याला वाहून घेतले. गडचिरोलीत त्यांनी बालमृत्यू रोखण्यसाठी केलेल्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्याचबरोबर बंग दाम्पत्याने महिलांचे आरोग्य दारूबंदी या विषयांवरही काम केले आहे.
केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील काही जणांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो.