चंद्रपूर/प्रतिनिधी:
गेल्या सहा महिन्यांपासून मानधन थकित असल्याने संगणक परिचालकांवर उपासमारीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील ६६८ संगणक परिचालकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाप्रति रोष व्यक्त केला.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये डाटा एन्ट्री आॅपरेटर म्हणून संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त संगणक परिचालक ग्रामपंचायतीचे विविध आॅनलाईन कामे नियमित करीत आहेत. मात्र त्यांना मानधन देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. गेल्या जुलै महिन्यापासून मानधन थकित असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी परिचालकांनी ठिय्या आंदोलन करून लक्ष वेधले.