औरंगाबाद/प्रतिनिधी:
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत घोषणाबाजी करून खुर्च्यां फेक करणा-या सुमारे १५०हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन सोहळ्याचा कार्यक्रमप्रसंगी रात्री सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नामविस्तार वर्धापनदिन सोहळा एकाच व्यासपीठावरून साजरा करण्यासाठी रिपाइंचे विविध पक्ष, संघटनांनी एक व्यासपीठ उभारले होते. या व्यासपीठावर न येता आठवले यांनी त्यांच्या पक्षाने उभारलेल्या व्यासपीठावर गेले. ही बाब खटकल्याने शंभर ते दिडशे कार्यकर्त्यांनी आठवले यांच्या सभेच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यापैकी काही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकी सुरू केली. वारंवार आवाहन करूनही घोषणाबाजी थांबत नसल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे आणि अन्य अधिकारी कर्मचा-यांनी घोषणाबाजी करणा-या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे मात्र काही काळ या कार्यक्रमात व्यत्यय आला होता. यानंतर आठवले यांची सभा शांततेत पार पडली.
याविषयी बोलताना सहायक पोलीस आयुक्त कोडे म्हणाले की, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत घोषणाबाजी करणा-या १०० ते १५० कार्यकर्त्यांना आम्ही ताब्यात घेतले. त्यानंतर माननीय मंत्रीमहोदयांची सभा व्यवस्थित पार पडली.