कोरपना/प्रतिनिधी:
कमी पटसंख्या असल्याच्या कारणावरून कोरपना तालुक्यातील गेडामगुडा, गोविंदपूर, कोठोडा (बु.), चेन्नई (खु.) व भोईगुडा या पाच शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत. शाळा सुरु करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात कोरपना बसस्थानकावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात पाचही आदिवासी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कोरपना तालुका पेसा कायद्यांतर्गत येतो. पेसा कायदा मजबूत करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी शासनाची असते. मात्र पेसा कायद्यांतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतीतील १०० टक्के आदिवासी गावातील शाळा कमी पटसंख्येमुळे शासनानेच बंद केल्यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. मात्र इतर शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यास पाचही गावातील पालकांचा बहिष्कार आहे.
येत्या ७ दिवसांत शाळा सुरु न केल्यास जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पाचही गावातील पालकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांना देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, पंचायत समितीचे सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभा कोवे, माजी जि. प. सदस्य उत्तम पेचे, मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश राजूरकर, सरपंच गेडाम व पाचही गावातील महिला, पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते.
चुकीच्या सर्वेक्षणामुळे शाळा बंद
विशेष म्हणजे, बंद करण्यात आलेली गेडामगुडा शाळा आय.एस.ओ. व शाळासिद्धीत ‘अ’ श्रेणीत आहे. मात्र या शाळेलाही बंद यादीत टाकल्याने गावकरी कमालीचे हताश झाले आहेत. ही शाळा नामांकित असून या शाळेच्या विकासात पालकांचे मोठे योगदान आहे. आतापर्यंत ४०० च्यावर शिक्षकांनी या शाळेला भेटी दिल्या. गोविंदपूर, कोठोडा (बु.), चेन्नई (खु.) व भोईगुडा या शाळांपासून १ किमीच्या आत एकही शाळा नसताना चुकीचे सर्वेक्षण पं. स. शिक्षण विभागाने केल्याचा आरोप उपसभापती संभा कोवे यांनी केला.