भद्रावती/वरोरा ( शिरीष उगे ):
भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटका एम्टा ही खुली कोळसा खान ही गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. ही कोळसा खान सुरु असतांना साठवुन ठेवलेला जवळपास दिड लाख टन कोळसा एम्टाच्या सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्याच्या संगमताने चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आजपावेतो या खाणीतून हजारो कोटी रुपयाचा कोळसा चोरीस गेला आहे.
कोळसा खान वितरित करतांना तत्कालीन युपीए सरकारने चुका केल्या असे सद्याच्या एनडीए सरकारच्या निर्देशनास आल्यानंतर त्यांनी देशातील अनेक कोळसा खाणी बंद केल्या त्यात तालुक्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीचा सुद्धा समावेश आहे. हा कोळसा खान मार्च २०१५ ला बंद करण्यात आली. खान सुरु असतांना काढलेला कोळसा इतर वाहतुकीकरिता एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आला. परंतु बंदीमुळे तो त्याठिकाणी तसाच राहिला. या कोळश्यासोबत खाणीतील इतर कार्यरत वाहनांची तसेच कार्यालयाची देखभाल करण्याकरिता कर्नाटका एम्टा कंपनीचे सुरक्षा अधिकाऱ्यांसह ५० च्या वर सुरक्षा कर्मचारी नियुक्त करून ठेवले आहे. हे कर्मचारी आजही याठिकाणी आहेत. बंदच्या काढत या कर्मचाऱ्यांची काही कोळस्या व्यापाऱ्यांशी साठ - गाठ करून त्याठिकाणी कंपनीने काढून ठेवलेला दिड लाख टन कोळसा विकण्याचा त्यांनी सौदा केला.
या कोळस्याची किंमत हजारो कोटीच्या दरात जाते. या खाणीतून रात्रोला जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये कोळसा भरून वणी सोबतच इतर ठिकाणी विकला जात आहे. हे काम गेल्या वर्षापारापासून सरार्स सुरु आहे. याव्यतिरिक्त दररोज पहाटेच्या वेळेस २० ते २५ दुचाकी मोटार सायकलस्वार एकाच वेळेस एका गाडीवर ४ पोती कोळसा भरून त्याची वाहतूक करीत आहे. हा कोळसा विटभट्टीधारक तथा लहान कोळसा व्यापाऱ्यांना विकल्या जात आहे. आज याठिकाणी केवळ २० ते २५ हजार टन कोळसा शिल्लक आहे. ज्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कंपनीने पगारी नेमणूक करून सुरक्षा करण्याचे काम दिले आहे तेच कर्मचारी सुरक्षा ऐवजी हा संपूर्ण कोळसा चोरीच्या घश्यात घालीत आहे.
आठवळाभरापूर्वी दुचाकीने कोळसा वाहतूक करतांना एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी वाहनधारक गंभीर जखमी झाल्याची घटना मानोरा फाट्याजवळ घडली. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. सदर प्रकरणाने स्थानिक काही पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. करिता या प्रकरणाचे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी चौकशी करून दोषींवर कारवाही करावी. खान चालू असतांना स्टॉक रजिस्टरमध्ये नमूद केलेला कोळसा त्याठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे हे लक्षात घेता याच सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी या साठविलेल्या कोळशाच्या काही भागाला आग लावून तो जळून खाक झाल्याचे आढळून आलेले आहे.