সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 09, 2018

नागपुर येथून सौदी अरेबियात विकण्यात आलेली महिला १५ महिन्यानंतर परतली घरी

नागपूर/प्रतिनिधी:   


 नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख रुपयात सौदी अरेबिया येथे विकण्यात आलेली महिला १५ महिन्यानंतर आपल्या घरी परतली. सक्करदरा पोलिसांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले. रुख्साना बेगम सलमान खान (३२) असे पीडित महिलेचे नाव असून ती ताजाबाद येथील रहिवासी आहे.

रुख्साना यांना शमा बेगम आणि हाजी साहब नावाच्या व्यक्तीने खाडी देशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी सईन आणि मुंबईतील मुस्तफा नावाच्या साथीदाराच्या मदतीने तिला आपल्या जाळ्यात अडकविले. सप्टेंबर २०१६ मध्ये तिला मुंबईला पाठवले. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दुबईला पाठवण्यात आले. दुबईवरून तिला सौदी अरबला पाठवण्यात आले. तिथे एका शेखच्या घरी ती मोलकरणीसारखी राहू लागली. रुख्साना यांच्यानुसार सुरुवातीला शेख कुटुंबाने तिच्यासोबत सामान्य व्यवहार केला. परंतु काही दिवसातच त्यांचा व्यवहार बदलला. ते तिला त्रास देऊ लागले. तिला पोटभर जेवण दिले जात नव्हते. सातत्याने काम करायला लावायचे. मारहाण करायचे. एखाद्या गुलामासारखी वागणूक दिली जात होती. रुख्साना हिने जेव्हा भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिला दोन लाख रुपयात खरेदी केल्याचे सांगण्यात आले. दोन लाख रुपये परत केल्यावरच ती भारतात जाऊ शकेल, असेही सांगितले. रुख्सानाने आपल्या बहिणीला आपबिती सांगितली. तिची बहीण कनिजाने ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, सविता पांडे आणि सुनिता ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या मदतीने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जून २०१७ मध्ये पोलिसांनी मानव तस्करीचा गुन्हा दाखल करून शमा बेगम आणि हाजी साहब याला अटक केली.
गुन्हा दाखल केल्यानंतरही रुख्सानाला घरी परत येता आले नाही. सौदी अरब येथील प्रकरण असल्याने पोलिसांनी विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. विदेश मंत्रालयाकडून घरी परत आणण्यास उशीर झाला. भारतात परत येण्यासाठी रुख्सानाला विमानाच्या भाड्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. इतक्या रकमेची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. पोलिसांनी शेख कुटुंबावर दबाब टाकला. मानव तस्करीच्या प्रकरणात कारवाई होण्याच्या भीतीने शेख कुटुंब रुख्सानाला नागपूरला परत पाठवण्याची व्यवस्था करण्यास तयार झाले. रुख्सानाला वेतनाच्या रूपात मिळणाऱ्या रकमेतून तिला मुंबईला पाठवले. मुंबईवरून ती नागपूरला परत आली. सक्करदरा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी पीएसआय डी. एम. राठोड यांनी तिचे बयान नोंदवून घेतले. यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.



मुलांच्या भविष्यासाठी केले काम
१५ महिन्यानंतर आपल्या मुलांना व कुटुंबीयांना पाहून रुख्सानाचे डोळे भरून आले. तिचा पती मजुरी करतो, तीन मुलं आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी ती खाडी देशात जाऊन काम करण्यास तयार झाली होती. तिला शेख परिवार अतिशय श्रीमंत असल्याचे माहीत होते. परंतु तिथे तिला दोनवेळचे जेवणही मिळेनासे झाले होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.