चंद्रपूर, ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ अशा स्थितीला तोंड द्यावे लागत असलेले एसटी महामंडळ आता प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देणार आहे. महसूल वाढीच्या या नव्या प्रयत्नाला नव्या वर्षीच सुरुवात होत आहे.
त्यात महत्त्वाच्या १६ टिप्स चालक-वाहकांना पाठ कराव्या लागणार आहेत. नमस्कार, मी बसचा वाहक असून, आपले स्वागत करीत आहे. माझे सहकारी हे या बसचे चालक आहेत. ही बस इतक्या वाजता सुटून इतक्या वाजता पोहोचेल. आपली बस या मार्गाने जाणार, शेवटचे ठिकाण, मार्गात कुठे-कुठे ही बस थांबेल, यासह अन्य बाबींचा समावेश आहे.
चंद्रपूर- गडचिरोली विभागात सात डेपो आहेत. त्यात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, चिमूर, वरोरा, गडचिरोली आणि अहेरी या डेपोंचा समावेश आहे. या सर्व डेपोतून दररोज बसगाड्यांच्या अडीच हजार फेर्या होतात. मात्र, डिझेलच्या वाढत्या किमती, टायर, मेंटेनन्स, कर्मचार्यांचे वेतन याचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात चालले आहे.
ही तूट भरून काढण्यासाठी ‘वाहकांचे प्रवाशांना सौजन्य- अभिवादन’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. चंद्रपूर-गडचिरोली विभागात ५३७ बसगाड्या आहेत. चालक एक हजार ४३, तर वाहक एक हजार दहा आहेत. या उपक्रमातून महामंडळाच्या उत्पन्नवाढीस मदत होईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी एस. एस. डाबरसे यांनी दिली.