সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 05, 2014

राज्य ग्रंथालय संघाचे 11 पासून अधिवेशन

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे 52 वे अधिवेशन 11 आणि 12 जानेवारीला दापोलीत आयोजित केल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रवींद्र कालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यामध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्याचा मान दापोलीला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त दोन दिवस विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

दापोलीच्या हरी केशव गोखले वाचनालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कालेकर बोलत होते. दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्‍वरैया सभागृहात अधिवेशन होणार आहे. यावेळी राज्यभरातील ग्रंथालयांचे सुमारे दोन हजार दोनशे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 10 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता नियामक मंडळाची सभा, रात्री 8 वाजता महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा होणार असल्याचे श्री. कालेकर यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 11 जानेवारीला सकाळी 8 वाजल्यापासून राज्यातून आलेल्या विविध प्रतिनिधींची नोंदणी होणार आहे. सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडी, त्यानंतर विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात मुख्य कार्यक्रम होईल. सकाळी 10 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन होईल. हरी केशव गोखले वाचनालयाचे अध्यक्ष अशोक वैद्य प्रास्ताविक करणार आहेत. अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू भूषविणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर असतील.

कार्यक्रमाला आमदार सूर्यकांत दळवी, नगराध्यक्षा सौ. विनिता शिगवण, कुलगुरू डॉ. किसन लवांडे, रत्नागिरी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, ग्रंथालय संचालक डॉ. बा. ए. सनान्से, प्रमुख कार्यवाह राम देशपांडे, ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गंगाधर पटणे, माजी अध्यक्ष हरिदास टेंबुर्णे, कोकण विभाग अध्यक्ष मनोज गोगटे, हरी केशव गोखले वाचनालयाचे विश्‍वस्त रवींद्र भिडे, सौ. गीतांजली भिडे आदी उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात 11 तारखेलाच द्वितीय सत्रात दुपारी 3 ते 5 या वेळेत "ग्रंथालयाशी ऋणानुबंध'वर रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सौ.जयश्री करकरे-बर्वे, "ग्रंथालय चळवळीच्या दिशा' वर जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राचे अध्यक्षपद दापोलीचे सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप भूषविणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता "सार्वजनिक ग्रंथालये- संस्थात्मक कार्य-वर्तमान व भविष्य' या विषयावरील चर्चासत्रात प्रा. एन. जे. पाटील, प्रा. हरिदास रणदिवे, सूर्यवंशी, राजू बेलेकर, दि. बा. साबळे, डॉ. गजानन कोटेवार, मुरलीधर बोरसूतकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रवींद्र कालेकर भूषविणार आहेत. रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.

अधिवेशनात दुसऱ्या दिवशी 12 जानेवारीला सकाळी 6 वाजता सौ. रमा जोग "योग व प्राणायाम, आनंदी शरीर व मन' या विषयावर, तर सकाळी 9 वाजता होणाऱ्या चर्चासत्रात प्रा. शांता सहस्रबुद्धे "ग्रंथ वाचनाने मला काय दिले' या विषयावर, "ग्रंथालय- आनंदनिधान' या विषयावर फोंडा येथील डॉ. कृष्णाजी कुलकर्णी व अशोक नायगावकर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता या अधिवेशनाचा समारोप होईल. यावेळी ग्रंथालयासंबंधी सर्व काही व खुले अधिवेशन असणार आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे मार्गदर्शन करणार आहेत. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू असतील. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रंथालय संचालक डॉ. बा. ए. सनान्से, सहायक ग्रंथालय संचालक (मुंबई विभाग) श्री. द. मंगलपल्ली, काका कोतवाल, नंदा जाधव, शिवकुमार शर्मा, श्रीकृष्ण साबणे, नेमिनाथ सातपुते, अनिल बोगमवार उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष जयवंत जालगावकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे कोशाध्यक्ष गजानन कालेकर, हरी केशव गोखले वाचनालयाचे अध्यक्ष अशोक वैद्य आदी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.