दु:खितांच्या हाती दिली मशाल..
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी पीडित, शोषित समाजाच्या वेदना आपल्या कादंब-यांतून मांडल्या. या समाजाचं दु:ख कवितेतून मांडणा-या ढसाळ यांना त्यांनी केलेला सलाम-
१९९५ मध्ये परभणीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. तिथे मी आणि माझे मित्र गंडले गेलो होतो. संमेलनात पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं चाळता चाळता, बघता बघता ढसाळ यांचं ‘गोलपिठा’ हाती लागलं. तीन दिवस साहित्य संमेलनात राहून घरी गेलो ‘गोलपिठा’चं पान उघडलं. पहिल्या ओळीपासून सुरुवात केली अधाशासारखं ‘गोलपिठा’ वाचलं. ‘गोलपिठा’ने फार अस्वस्थ केलं. हादरून गेलो. जगात आपल्यासारखे अनेक लोक जगतात. आपण कुठल्या युगात जगतोय, असे न सुचणारे प्रश्न मला ‘गोलपिठा’वाचून व आपलं आयुष्य भोगून पडलेले. नंतरच्या काळात जवळजवळ मी त्यांची पुस्तकं वाचली. १९९७ मध्ये मुंबईत एका कार्यक्रमात ढसाळांची भेट झाली. बोललो काहीच नाही. पुढे नागपूरलाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. तेथे ढसाळ यांची मुलाखत बघितली. मुलाखतकार सतीश काळसेकर होते. कादंबरीमध्ये अरुण साधू व भालचंद्र नेमाडे मला आवडतात. नागनाथ कोतापल्ले ही माझे आवडते लेखक आहेत, तर कविता मला नारायण सुर्वे व नामदेव ढसाळांचीच आवडली. सुर्वेच्या व ढसाळांच्या कवितांचा बाज कोणीच तोडलेला मला आठवत नाही व तसं माझ्या वाचण्यात आलं नाही, नामदेव ढसाळांनी शोषित, पीडित, दलित, मोडलेल्या माणसांचं जगणं आपल्या साहित्यात मांडलं.
ढसाळ यांचं लेखन सर्वहारा परिवर्तनाचे विचार पावलोपावली ठेवत जगण्याचं आत्मभान देतं. हे आत्मभान समाजपरिवर्तन, मानवी जीवनातील परिवर्तन आणि वैचारिकतेशी निरगाठ बांधणारं आहे, त्यामुळे त्यांचं लेखन दलित साहित्य प्रवाहातील एक बहुआयामी आणि मैलाचा दगड ठरतो. लेखनासाठी शासनाने त्यांना अनेक वेळा पुरस्कृत केलं तर साहित्य अकादमीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केलं. भारत सरकारने त्यांना साहित्यासाठी पद्मश्री दिलं. सोव्हिएत लँड नेहरू हा पुरस्कारही त्यांना प्राप्त आहे. नकार विद्रोह व माणूसपणाची बिजं त्यांच्या साहित्यात ठासून भरलेली होती. मानवमुक्तीच्या लढय़ासाठी अमेरिकेत ब्लॅक पँथरची निर्मिती करण्यात आली. दलित पँथरच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. ढसाळ ‘दलित पँथर’शी अखेपर्यंत एकनिष्ठ राहिले. जातीयवादाच्या विषवल्लीत भारतात माणसाला काहीच किंमत नाही, राजकारणाच्या मैदानात हा कलावंत निवडून आला असता किंवा त्याने संधी दिली असती तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. त्यांची पुस्तकं जगभरात शिकविली जातात. वाचली जातात, त्या माणसाला राजकारण्यात फेल केलं जातं. पुढे येऊ दिलं जात नाही. विचारवंत, दृष्टी असणारा माणूस राजकारणात यशस्वी होणार नाही, तोपर्यंत समूळ परिवर्तन कसं शक्य आहे, असं मला वाटल्यावाचून राहत नाही व त्यात सत्यताही आहे.
शोषितांच्या वास्तव जीवनाची जाणीव नामदेव ढसाळांनी भौतिकवादी आशयाच्या अंगाने आविष्कृत केली आहे. वीतभर पोटाला भरण्यासाठी जीवनभर जी कष्टप्रद संघर्षाची पायवाट चालावी लागते, त्याच जीवनानुभवाची जाणीव नामदेव ढसाळ यांनी मांडलेली दिसते, त्यामुळे कधी अर्धपोटी, तर कधी उपासमार करत जगणा-या शोषित लोकांचं चित्र त्यांनी प्रभावीपणे आपल्या लेखनात चित्रित केलं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हा मानवाचा मूलभूत अधिकार असला तरी विषमतावादी समाजव्यवस्थेने तो त्यांच्या वाटय़ाला घातलेला नाही. साहित्यात नामदेव ढसाळांनी त्याच्या विरोधात हाक दिली. आयुष्याने नेहमी अस्वस्थ ठेवलेल्या ढसाळ यांची या व्यवस्थेने नेहमी फसगत केली आहे. ती त्यांची एकटय़ाची फसगत नाही, तर पिढय़ान् पिढय़ा शोषणाच्या गर्तेत खितपत पडलेल्या जातीपातीच्या उतरंडीत त्याची बीजे पेरली गेलेली होती आणि आहेत यात दुमत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवून त्यांचा लेखनप्रवास सुरू होता. बुद्धाने सांगितले, जे निर्माण झाले ते नष्ट होणार आहे. सर्वानाच एकना एक दिवस मृत्यू आहे. पण नामदेव ढसाळांना आयुष्य कमी मिळाले. अवघ्या ६४व्या वर्षी ते गेले. त्यांच्या जाण्याने दलितच नव्हे तर एकूणच मराठी साहित्याची फार मोठी हानी झाली. ती आता कधीही भरून निघणार नाही एवढे मात्र खरे. साहित्यात परंपरागत साहित्याच्या विरोधात बंड करणा-या कवींच्या जाण्याने माझ्यासह अनेकांच्या मनाला चटका लागलेला आहे. बंड करूनच ते शिवसेनेकडे वळले, तेव्हा अनेक जण हादरले होते.
सामाजिक विषमतेच्या मुळावरच घाव घालून मानवी समतेचा जीवनाशय फुलवण्यावर ढसाळ यांची नजर होती. आत्मपिडेचे वेदनामयी गाणे अधोरेखित करताना सामाजिक स्तरावरील विषमतेकडे ते दुर्लक्ष कधीच करत नसत. तो त्यांच्या लेखनाचा गाभा होता. जातीजातीत, वाटलेल्या वाडय़ांत, वस्त्यांत, झोपडपट्टय़ांत विभाजित झालेल्या शोषित समाजाचा ढसाळ एक घटक होते. त्या दलित, पीडित जीवनातूनचत्यांचे जीवन आकाराला आलेले आहे. जातीपातीच्या वणव्यात पिचत चाललेला आर्थिक कुचंबणेने गुदमरलेला, जीवनावश्यक गोष्टींच्या किमान पूर्तीला महागलेला व्यथित, शोषित, पीडित ढसाळांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी होता, हे विशेष आहे. त्यांचे लेखन नेहमी शोषितांच्या बाजूनेच राहिले, त्यापासून तसूभरही ढळले नाही.
माणूस हा नामदेव ढसाळांच्या लिखाणाचा एक जिवंत, जातिवंत घटक आहे. या घटकावर त्यांचा पूर्णपणे विश्वास असल्यामुळे जातिभेदविरोधात व शोषित-पीडितवर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसते.लोकशाही कोणत्या गाढविणीचे नाव आहे, अशी पहिली किंकाळी फोडून नामदेव यांनी येथली व्यवस्था हादरून टाकली. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा माणसाला पूर्ण करता येत नाही ते स्वातंत्र्य, ती लोकशाही काय कामाची, हे नामदेव ढसाळांनी आम जनतेला पटवून सांगितले. ‘शेवटी तुझे बोट धरून चाललो आहे मी’ या काव्यसंग्रहात बाबासाहेबांनी हजारो वर्षाच्या इतिहासाला वैचारिक नेतृत्वाने पालथे करून सन्मार्गाने जगायला शिकविले. ज्यांनी कालपर्यंत गुलामीचा, क्रॉस खांद्यावर घेऊन अंधारयात्री होऊन शतकांचा प्रवास गाठला, त्यांना क्रांतिकारी उजेडाची मशाल बहाल करून जगण्याचे नवे आकलन दिले. हे बाबासाहेबांचे कार्यकर्तव्य विषद करताना नामदेव म्हणतात,
कळीकाळाची आव्हाने स्वीकारून
कित्येक शतकांचा काळोख ओलांडून
तु घेऊन आला आम्हाला सुरक्षित स्थळापर्यंत
आज आमचे जे काही आहे
ते सर्व तुझेच आहे.
दीनदु:खितांचा हात मशाल देणा-या व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणा-या नामदेव ढसाळ नावाच्या पँथरला माझा सलाम.
कळीकाळाची आव्हाने स्वीकारून
कित्येक शतकांचा काळोख ओलांडून
तु घेऊन आला आम्हाला सुरक्षित स्थळापर्यंत
आज आमचे जे काही आहे
ते सर्व तुझेच आहे.
दीनदु:खितांचा हात मशाल देणा-या व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणा-या नामदेव ढसाळ नावाच्या पँथरला माझा सलाम.
http://prahaar.in/collag/175876