चंद्रपूर - शेतकरी संघटनेचे 12वे संयुक्त अधिवेशन शुक्रवार(ता. आठ) पासून येथील क्लब ग्राउंडवर सुरू झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या या अधिवेशनात माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.
या अधिवेशनात 14 राज्यांतील शेतकरी नेते सहभागी होऊन देशपातळीवरील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतील. पहिले दोन दिवस हे अधिवेशन बंदिस्त सभागृहात चालणार असून, यात तीन हजार कार्यकर्ते सहभागी होतील. तिसऱ्या दिवशी खुल्या अधिवेशनात 50 हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष रवी देवांग यांनी पत्रपरिषदेत दिली.
शेतकरी संघटनेच्या स्थापनेला 33 वर्षे पूर्ण झाली असून, आतापर्यंत विविध ठिकाणी अनेक प्रभावी आंदोलने करून शासनाला वेठीस धरलेले आहे. शेतमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी संघटनेने मांडलेल्या भूमिकेचे देशपातळीवर अनेक विचारवंतांनी स्वागत केले आहे. राजुऱ्याचे माजी आमदार ऍड. वामनराव चटप हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत चांगलाच रंग भरलेला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत ते उमेदवार असून, या अधिवेशनात त्यांचे शक्तिप्रदर्शनच होऊ घातले असल्याने अधिवेशनाच्या तयारीकरिता त्यांनी पूर्ण शक्ती झोकून दिलेली आहे.
केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षेमुळे देशातील शेतकरी चिंतेत असून, हे अन्न सुरक्षा नव्हे तर खुर्ची सुरक्षा असल्याचे मत ऍड. चटप यांनी व्यक्त केले. याशिवाय शेतजमीन सीलिंग कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संताप निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.