जिल्ह्यातील साडेचारशे लोकांची ९ कोटीहून अधिकची फसवणूक
चंद्रपूर- आतापर्यंत केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना फसविणा-या घोटाळेबाज कंपन्यांनी आता जिल्ह्याची सीमा ओलांडून विदर्भ गाठला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील तीस-या शेअर गुंतवणूक कंपनीच्या संचालकाला अटक झाल्याने सामान्य गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ताज्या घोटाळेबाज कंपनीचे नाव सिल्व्हर लाईन कॅपिटल असे आहे तर लुटीची एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आकडेवारी आहे तब्बल ९ कोटी.

सिल्व्हर लाईन कॅपिटल या घोटाळेबाज कंपनीने आपले जाळे केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर लगतच्या गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यातही चकचकीत शाखा उघडून गरीब, मध्यमवर्गीय व समाजातील उच्चभ्रू व्यक्तीना आपले लक्ष्य केले. यासाठी कंपनीने विविध ठिकाणी आपले एजंट नेमले होते. काही ठिकाणी तर वरिष्ठ सरकारी अधिका-यांना मोठ्या दलालीचे आमिष दाखवून अधिनस्थ कर्मचा-यांना या कंपनीमार्फत गुंतवणूक करण्याची सक्ती केली गेल्याच्या तक्रारी आहेत. सध्या पोलिसांनी सिल्व्हर लाईन कॅपिटल चा संचालक कर्मवीर तेलंग याला अटक करून ३ दिवसांची पोलिस कोठडी मिळविली आहे. अतिशय नियोजनबद्ध रीतीने आर्थिक लुबाडणूक करणा-या सिल्व्हर लाईन कॅपिटल सारख्या कंपन्यांबद्दल असणारी माहिती लोकांनी तातडीने द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेअर गुंतवणूक करा व रक्कम अल्पावधीत दुप्पट करा अशी बतावणी करणा-या सर्वात पहिल्या मनीमंत्र कंपनीच्या घोटाळेबाज संचालक दाम्पत्त्याची चौकशी व त्यांनी लुबाडलेली रक्कम याची मोजदाद अद्याप सुरु आहे. हे दांपत्य गजाआड झाल्यावर मनी ट्री च्या उच्चभ्रू संचालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे. आता सिल्व्हर लाईन कॅपिटल च्या संचालकांना कोठडीचे गज मोजावे लागत आहेत. प्रश्न केवळ या घोटाळेबाज संचालकांच्या मुसक्या बांधून सुटणार नाहीये. ज्यांनी तक्रार केली ते व ज्यांनी लाज वाटून तक्रार न करता लाजेखातर मागे राहणे पसंत केले अशा हजारो छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांच्या रकमा परत मिळतील का हा खरा सवाल आहे. ज्यांनी अशा घोटाळेबाज कंपन्यांना सत्य माहित असूनही अभय दिले अशा पोलिस अधिका-यानाही शिक्षा होणे गरजेचे आहे. अन्यथा गुंतवणूकदारांची लूट सुरूच राहणार आहे.