সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 24, 2013

नव्या वळणाचं 'साटंलोटं'

कामानिमित्त एकत्र आल्याने वाढलेली सलगी. त्यानंतर स्वत:ला सावरूनही एकमेकांच्या प्रेमात पडलेल्यांचे मानसिक द्वंद आणि आपल्या आई, काकावर जिवापाड प्रेम करणार्‍या या युगलाने भावी आयुष्यासाठी आपल्यासोबत त्यांच्याही लग्नाचा घातलेला घाट अशा काहीशा विचित्र वळणावर येऊन ठेपणारे 'साटलोटं' हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पार पडले. रत्नाकर मतकरी यांची कलाकृती असलेल्या या नाटकाचे सादरीकरण यवतमाळच्या सिद्धीविनायक प्रतिष्ठानने केले. पूर्वार्धात थोडे रटाळ वाटणारे कथानक नंतरच्या दोन-तीन प्रवेशानंरत मात्र वेग घेते. पुढे दुसर्‍या अंकानंतर मात्र ते मुळ धरत जाते. सर्व काही ठिक चालले असताना दुसर्‍या अंकात अचानकपणे बदललेला क्लायमॅक्स, त्यामुळे निर्माण झालेली भावनांची वादळे आणि नाटकातील 'उर्मी'ने आपल्या स्वभानुरूप सावरलेली परिस्थिती व त्यामुळे नाटकाचा झालेला सुखांत शेवट, असेच या नाटकाचे थोडक्यात वर्णन करावे लागेल.

विधवा-विधुरांच्या पूनर्वसनाचा काहीसा संदेश देणारे हे नाटक. रोटी-बेटीच्या सामाजिक व्यवहारातील साटंलोटंचा आधार घेत नाटककाराने उभारलेल्या प्रतिमा आणि त्यांना रंगभूमिवर न्याय देण्याचा हा सिद्धीविनायकचा प्रयत्न तसा कौतुकास्पद राहिला. नव्या जुन्या कलावंतांच्या साथीने सादर केलेला हा प्रयोग काही तांत्रिक दोष वगळता तसा यशस्वीच ठरला. अवंतिकाच्या मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या कल्पना जोशी यांनीही आपल्या परिने भूमिकेला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी, उर्मीची भूमिका साकारलेल्या अपूर्वा बेनोडकर या नवोदित कलावंताने हे नाटक बरेच तोलून धरले. अपूर्वाची रंगमंचावरील धिटाई, अवांतिकासोबतच्या संवादात तिच्यावर केलेली मात, आपले म्हणणे कधी लडीवाळपणे, कधी रागाने, तर कधी आग्रहाने पटवून देताना कलावंत म्हणून तिचा लागलेला कस प्रेक्षकांना भावला. संजय माटे यांनी साकारलेली देसाईची भूमिकाही कसदार ठरली. राहूल रेणकुंटलवार या युवा कलावंताने साकारलेली रमोलची भूमिका अधिक सकस झाली असती तर, नाटकातील रंग पुन्हा गहिरा झाला असता. अवांतिकाच्या घरात अध्येमध्ये डोकावणारी आणि आपले दु:ख मांडणारी मैत्रिण नेहाच्या भूमिकेत असलेल्या अपूर्वा बेनोडकर यांनाही बराच वाव होता, पण तो कमी पडल्याचे दिसले. पहिल्या अंकात आणि सुरूवातीच्या एक-दोन प्रवेशात थोडी संकोचलेली कलावंतांची अवस्था नंतरच्या दुसर्‍या अंकात सावरल्याचे प्रयोगात दिसले. 'साटलोटं' हे नाटकाचे नाव असल्याने अखेरच्या गोड प्रसंगातील छायाचित्रणाच्या क्षणी ते स्पष्ट करण्यास दिग्दर्शकाला बराच वाव होता. पण ती संधी घेता आली नाही. सर्वच कलावंतांचे पाठांतरण उत्कृष्ठ असले तरी, काही प्रसंगात पात्रांच्या शब्दोच्चरणातील चुका वगळता नाटक सुंदरच झाले. अशोक कार्लेकर यांनी प्रकाश योजनेची बाजू सांभाळली. या सोबतच, कल्पना जोशी (दिग्दर्शन), विनोद नायडू-धनंजय जोशी (नेपथ्य), प्रा. चंद्रशेखर कुडमेथे-विशाखा जोशी (संगीत), संजय उइके-अभिषेक यादव (रंगमंच व्यवस्था), बासुरी तिवारी (वेषभूषा), वैशाली माटे (रंगभूषा), प्रसाद देशपांडे-ओम जोशी (पार्श्‍वगायन), प्रविण पेशवे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.