সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 17, 2013

'मिस युनिव्हर्स' मराठमोळी मानसी!

महाविद्यालयाचा रंगमंच ते

 'मिस युनिव्हर्स' मराठमोळी मानसी!


मंगेश खाटीक
http://chandrapurnews.blogspot.in/
----------------
बालवयापासूनच पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या मानसीने फॅशनच्या क्षेत्रातील 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत मजल गाठली. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सुष्मिता सेन व लारा दत्ता यांच्यानंतर 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत भाग घेणारी मराठमोळी चंद्रपूरची कन्या भारतातील तिसरी सौंदर्यवती ठरली आहे. मानसीला लहानपणापासूनच नृत्य, गाणे व फॅशन शो स्पर्धेमध्ये भाग घेण्याची आवड होती. शालेय जीवनापासून तर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. प्रत्येक स्पर्धेतून तिला मिळत गेलेल्या यशातून दिवसागणिक फॅशनच्या रंगमंचावर तिची चुणूक दिसू लागली. फॅशन क्षेत्रातील नामांकित स्पर्धांमध्ये तिला क्रमांक पटकावता आला नसला तरी 'वाईल्ड कार्ड एन्ट्री'मधून मानसीला 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत प्रवेश मिळाला आणि 'मिस अँक्टिव्ह' हा पुरस्कारही पटकावता आला. मात्र त्या स्पर्धेत 'विनर' होण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. यातच भारतात पहिल्यांदा 'मिस दिवा' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि हीच स्पर्धा मानसीच्या जीवनातील 'टर्निंग पॉइंट' ठरली. या स्पर्धेत मानसीने पहिला क्रमांक पटकावल्याने नामांकित अशा 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत एन्ट्री मिळाली. कॉलेजमधील स्पर्धेतून एक-एक पल्ला गाठत मानसीने हे शिखर सर केले असल्याचे तिचे वडील डॉ. मिलिंद मोघे अभिमानाने सांगतात.

चंद्रपुरातील वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात मुख्य चिकित्सा अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. मिलिंद मोघे मूळचे इंदोरचे असले तरी नोकरीच्या निमित्ताने मागील चार वर्षांपासून महाराष्ट्रात आपली सेवा देत आहेत. मानसीची आई डॉ. जयश्री मोघे याच रुग्णालयात उपमुख्य चिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी सीपी अँण्ड बेरार या प्रांतात इंदोरचा समावेश होता. त्यामुळे नागपूरशी आधीपासूनच मोघे कुटुंबाची नाळ जोडली गेली आहे. मानसीचा जन्मसुद्धा नागपूरचा असून ती नागपुरातीलच सेंट विन्सेंट पलोटी इंजिनीयरिंग कॉलेज ऑफ टेक्नालॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेत आहे. यंदा मानसीचे अंतिम वर्ष असून मागील चार वर्षांत महाविद्यालयातील प्रत्येक फॅशन शोमध्ये 'बेस्ट मॉडेल' म्हणून तिला गौरवण्यात आले होते. मानसीचे बारावीपर्यंतचे शिक्षण इंदोरला झाले. त्यानंतर आई-वडील छत्तीसगडमध्ये असल्याने मानसीने नागपूरच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनच्या चौथ्या वर्षात असताना 'मिस इंडिया' स्पर्धेसाठी नागपुरात ऑडिशन झाली. त्यात मानसी पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये 'सिलेक्ट' झाली. त्यानंतर पहिल्या पाच सौंदर्यवतींना पुण्यात झालेल्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी मानसीला क्रमांक पटकावता आला नसला तरी 'आयकॉनिक आय' हा पुरस्कार मिळाला. या स्पर्धेनंतर लगेच 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून मानसीला प्रवेश मिळाला. परंतु यातही मानसी क्रमांक पटकावू शकली नाही. परंतु तिला 'मिस अँक्टिव्ह' या पुरस्काराने गौरवण्यात आले.

फॅशन क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानसीने तिच्यातील गुणांची रंगमंचावर चुणूक दाखवली. त्यामुळे मराठमोळ्या मानसीची कला परीक्षकांच्याही नजरेत भरली होती. अशातच योगायोगाने भारतात पहिल्यांदा 'मिस दिवा' ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मानसीला पाचारण करण्यात आले आणि तिच्या आतापर्यंतच्या जिद्द व चिकाटीला यश आले. मिस दिवा स्पर्धेत मानसी सर्वोत्कृष्ट ठरल्यानंतर थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी चंद्रपूरची कन्या पात्र ठरली. या स्पर्धेत मानसीला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी दोन फेर्‍यांमधून ती अव्वल ठरत 'टॉप टेन'मध्ये राहिली. ही बाब चंद्रपूरचे नावलौकीक करणारी ठरली असून जगाच्या नकाशावर ब्लॅक गोल्ड सिटीचे नाव कोरले गेले आहे.

फॅशनच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मोठमोठय़ा शहरात कोचिंग क्लासेस आहेत; परंतु मानसीने कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये फॅशनचे धडे गिरवले नाही. तिला या क्षेत्रात आवड असल्यामुळे ती नेहमी महाविद्यालयातील व शहरातील फॅशन शोमध्ये सहभागी व्हायची. त्या वेळी कुटुंबातून प्रत्येकवेळी प्रोत्साहनच मिळत गेले. आई-वडिलांचे पाठबळ आणि स्वत:च्या परिश्रमातून मानसीने फॅशनच्या क्षेत्रातील उच्च शिखर गाठले असल्याचा गर्व आहे. तिच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील सहभागाने चंद्रपूरचे नाव उंचावले असल्याचे डॉ. मिलिंद मोघे यांनी दै. 'पुण्य नगरी'शी बोलताना सांगितले. मानसीला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे असून या स्पर्धेतील सहभागाने तिचा आत्मविश्‍वास वाढला आहे. मानसीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील सहभागाने भविष्यात चंद्रपुरातील इतर तरुणींना या क्षेत्रात जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धेत एन्ट्री मिळवणारी मानसी मोघे ही भारतातील तिसरी सौंदर्यवती आहे. यापूर्वी सिने अभिनेत्री सुष्मिता सेन व लारा दत्ता यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता. परंतु तिथपर्यंत मानसीने झेप घेतली नसली तरी फॅशन क्षेत्रातील एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत प्रवेश मिळवणारी विदर्भातील कदाचित पहिलीच तरुणी आहे. मानसीमध्ये असलेली जिद्द भविष्यात फॅशन क्षेत्रात चंद्रपूरचे नावलौकीक करणार असल्याचा विश्‍वासही डॉ. मिलिंद मोघे यांनी व्यक्त केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.