प्रिय मित्र
आज आपल्यासाठी पुन्हा एक सुंदर पुस्तक आणलंय. गिफ़्ट. पंख. लेखक : रत्नाकर महाजन.
यापुर्वी आम्ही रत्नाकर महाजन यांचं पंख -१ हे पुस्तक प्रसिद्ध केलं. लोकांना ते प्रचंड आवडलं. त्याची पावती अक्षरशः शेकडो लोकांनी पत्र पाठवून दिली. या पुस्तकात माणसाने उडणं शिकल्याच्या कथा होत्या. बलून, विमान आदींचे शोध कसे लागले याची कथा होती. सुरुवातीला माणूस विमानाकडे गंमत म्हणून बघत होता. नंतर प्रवासी वाहतूक, माल वाहतूक आणि युद्धासारख्या कामांत त्याचा वापर होऊ लागला. पण माणूस नुसतं उडून समाधानी नव्हता. पक्षांनाही अशक्य अशा गोष्टी करायची ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देईना. त्यातून त्याने हेलिकॉप्टर, रॉकेट, यानं बनवली. चंद्रावर पोहोचला. मंगळावर पोहोचला. आणि आता भारतही या रेसमध्ये मागे नाही. या सर्व प्रवासाची कथा पंख दोन मध्ये आहे.
पंख हे पुस्तक आम्हाला तर अत्यंत स्फ़ूर्तीदायक वाटलं. त्याचं कारण सांगतो. तसं पाहिलं तर माणूस हा अत्यंत हळू, मंद, स्लो. अगदी गोगलगाय, हत्ती आणि कासवांच्या जवळपास. साधं मांजर, कुत्रा, उंदीर हेसुद्धा माणसाहून चपळ. हरिण, वाघ, घोडा वगैरे तर बघायलाच नको. सरपटणारे सगळे प्राणी माणसाहून चपळ. उडणारे सर्व पक्षी आणि कीटकही माणसाहून वेगवान. अगदी फ़ुलपाखरूसुद्धा. घार ससाणा कावळा चिमणी तर बघायलाच नको. पाण्यातले मासेही माणसाहून वेगवान. जवळजवळ बारा लाख सजीव जाती आहेत. त्यांच्यामध्ये मानवाचा क्रमांक वेगामध्ये अकरा लाखाच्याही खाली जातो.
आणि तरीही मानवाने या सगळ्या प्राण्यांच्या पुढे जाऊन कल्पनातीत वेग धारण केला. तो फ़क्त संशोधन आणि चिकाटीच्या बळावर. माणूस चित्त्याहून जलद जाऊ शकेल असं दोन शतकांपूर्वी कोणी म्हटलं असतं तर लोक त्याला हसले असते. पण आज माणूस चित्त्याच्या आठपट वेगाने प्रवास करतो. गरूडाच्या दहापट वेगाने उडतो. शार्कच्या अनेकपट वेगाने पाण्याखालून प्रवस करतो. या प्रयत्नांत ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्यांना लोक हसले. पण त्यांनी इतिहास घडवलाच.
तेव्हा दात दाखवणारे लोक आता तोंडात बोटे घालतात.
मराठी भाषेला जगातील पहिल्या क्रमांकाची भाषा बनवायचे स्वप्न बाळगणाऱ्यांनाही लोक आज असेच हसतात. काय ही मराठीची दूरवस्था! आज महाराष्ट्रात दोन मराठी माणसेसुद्धा एकमेकांशी मराठीत बोलत नाहीत. महाराष्ट्रात दुकानांवर मराठी बोर्ड असावेत म्हणून “खळ्ळ खट्टाक” करावे लागते. मराठी कवी लेखकांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. मराठी शाळा ओस आणि बंद पडत आहेत. अशा वेळी मराठीचा डंका महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगभरात गजबजेल अशी स्वप्नं आम्ही पहातो. आमच्यासारखे अनेक लोक पहातात. २३०० वर्षांचा इतिहास असलेल्या या अमृतवाणी मराठी साहित्याचं सुवर्णयुग येईल अशी खात्री आम्ही बाळगतो. कारण मराठीत समृद्ध साहित्य आहे. कारण मराठी माणसांकडे बुद्धीमत्ता आहे. कारण मराठी माणसांकडे प्रतिभा आहे. कारण मराठी नवीन साहित्यिक आणि नवीन वाचकवर्ग उभा होताना आम्ही पहातो आहोत. बारा कोटी मराठी माणसांच्या या भाषेला अमरत्त्व आहेच आहे याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे. म्हणून आम्ही बारा लाख मराठी लेखक वाचकांचं नेटवर्क उभं करण्यासाठी आम्ही झटत असतो. दर आठवड्याला नवनवीन ई पुस्तकं दीड लाख लोकांना विनामूल्य पाठवत असतो.
हा यज्ञ दिवसेंदिवस मोठे रूप घेतो आहे. आणि त्यात हजारो हातांचं योगदान येत आहे. नवीन लेखक पुढे येत आहेत. हजारो लोक, रोज, कुणी आठ, कुणी दहा, कुणी शंभर, मेल आय डींचं योगदान देत आहेत. तुम्हीही तुमच्या ओळखीच्या शक्य तेवढ्या मराठी लोकांचे ई मेल आय डी आम्हाला पाठवा. त्यांना दर आठवड्याला विनामूल्य ई पुस्तकं पाठवली जातील. मराठी माणूस भले पैशात मागे असेल, पण वाचनात इतर लोकांपेक्षा नक्की पुढे आहे. आणि आज ना उद्या ही गोगल गाय वाटणारी भाषा ढाण्या वाघाचं स्वरूप धारण करील. करीलच!
सर्वांची साथ हवी मित्रांनो! कृपया आपल्या किमान आठ आप्त मित्रांच्या मेल आय डीesahity@gmail.com या पत्त्यावर कळवा आणि या महायज्ञात सामिल करा. त्यांना आम्ही नवनवीन मराठी पुस्तकं विनामूल्य पाठवू.
मानवाला वेगवान बनवणारं हे संशोधन कसंकसं झालं त्याची गोष्ट असलेलं हे पुस्तक. पंख. कसं वाटलं ते नक्की कळवा. esahity@gmail.com या ई मेल आय डी वर
या मेलसोबत जोडलेलं पुस्तक कमी रेझोल्युशनचं आहे. यातली काही चित्रं अस्पष्ट आहेत. चांगल्या ई कॉपीसाठी वेबसाईटला भेट द्या आणि विनामूल्य डाऊनलोड करा.
ई साहित्य प्रतिष्ठानची वेबसाईट हे सुंदर वेबसाईतचं एक उदाहरण आहे असं वाचक म्हणतात. आजवर त्रेचाळीस देशांतल्या सहा लाख लोकांनी या वेबसाईटला भेट दिली आहे. आपणही या छान आकर्षक वेबसाईटचे सभासद व्हा. विनामूल्य. आपलं मत कळवा.