সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 06, 2013

पुरामुळे महावितरणला सव्वाकोटीचा फटका

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2013 

चंद्रपूर - गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीसह अनेक गावांतील घरे पाण्याखाली आली. यात घरगुती वीजमीटर व रोहित्रे निकामी झाली. वीजखांब वाकले, तर वीजतारा तुटून पडल्या. त्यामुळे महावितरणला एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात सव्वाकोटीचा फटका बसला आहे. 

यंदा विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे चंद्रपूरसह, वर्धा, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या पाचही जिल्ह्यांत महावितरणचे सुमारे दोन कोटींच्या वर नुकसान झाले आहे. यात 42 डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍सेस खराब झालेत. 430 उच्चदाब तसेच 1831 लघुदाब खांब पडले. यापैकी 1084 लघुदाब खांब व 380 उच्चदाब खांब उभे करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. 33.41 किमी वीजवाहिनी तुटल्यामुळे ती बदलावी लागली. वीजपुरवठा करणाऱ्या 33 विद्युत रोहित्रांत पावसाचे पाणी गेल्यामुळे ते नादुरुस्त झाले. एकूण एक हजार 266 वीजमीटर पावसाने संपूर्णतः खराब झालेत. यात सर्वाधिक चंद्रपूर विभागाला फटका बसला आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यात चार दिवस पुराचे पाणी होते. त्यामुळे 87 गावे चार दिवस अंधारात होती. शिवाय चार-पाच दिवस शेतात पाणी राहिल्याने 900 शेतीपंप नादुरुस्त झाले. कोठारी-तोहोगाव परिसरातील 66 केव्ही उच्चदाब वाहिनी पाण्याखाली आली. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरश: डोंग्यामधून प्रवास केला. 

महावितरणच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या गोंडपिंपरी-आलापल्ली व आलापल्ली-सिरोंचा या महापारेषणच्या जंगलातून गेलेल्या 66 के. व्ही. उच्चदाब वीजवाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे आलापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली या तालुक्‍यांमधील सुमारे 500 गावे अंधारात होती. परंतु, 33 के. व्ही. वीजवाहिन्यांवर झालेले सर्व बिघाड महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लवकरच दूर करीत ग्राहकांना दिलासा दिला. सततच्या पावसामुळे कुठे जंपर कट करण्यात आले, तर कुठे रोहित्रे बंद, कुठे ग्राहकांचे मीटर काढावे लागले. 

वीज कर्मचाऱ्यांनी दाखविली तत्परता 
बिघाड झालेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी शिफ्ट ड्यूटी संपल्यानंतरही त्यांनी रात्री-अपरात्री दुरुस्तीचे काम केले. कुरखेड्यामध्ये तर पावसात विजांच्या कडकडात जीव धोक्‍यात घालून काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी आदर्श प्रस्थापित केला. कोठारी-तोहोगाव परिसरात नावेतून प्रवास करून रोहित्रांची दुरुस्ती केली. या सर्व कामात महावितरणचे पाच अधीक्षक अभियंते व सर्व 13 कार्यकारी अभियंते तसेच उपकार्यकारी अभियंत्यांपासून कनिष्ठ अभियंते व जनमित्रांनी कर्तव्य बजावले. 

42 डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍सेस खराब
430 उच्चदाब खांब पडले
1831 लघुदाब खांब पडले
33.41 किमी वीजवाहिनी तुटली
33 विद्युत रोहित्र नादुरुस्त
1 हजार 266 वीजमीटर खराब
900 शेतीपंपात बिघाड

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.