সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 04, 2013

चंद्रपुरात पुरामुळे लाखो हेक्‍टर शेती पाण्याखाली


चंद्रपूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यात शनिवारी (ता. 3) पावसाने विश्रांती घेतली. इरई धरणातून होणारा विसर्ग शुक्रवारी (ता. 2) दुपारपासून बंद करण्यात आला आहे; परंतु वर्धा, वैनगंगा, इरई, घरपट या नद्यांना पूर कायम आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरालगतच्या गावांत पूरस्थिती कायम आहे. 

गेले पंधरा दिवस सुरू असलेली अतिवृष्टी आणि भंडारा, वर्धा, अमरावती जिल्ह्यांतील धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला असून, नऊ हजार 198 कुटुंबे बाधित झाली आहेत. सात हजार 486 अंशतः तर एक हजार 398 घरे पूर्णतः पडली. जिल्ह्यातील एक लाख 46 हेक्‍टर जमिनीचे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, 70 हजार हेक्‍टर जमिनीचे 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. शेती तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली असून, नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

अप्पर वर्धा, लोअर वर्धा व इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात इरई व वर्धा नदीकाठावरील चंद्रपूर शहरासह बल्लारपूर, राजुरा तालुक्‍यात लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरले. एका महिन्यात तिसऱ्यांदा पुराचा सामना करावा लागत असल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत. या पुरामुळे सोयाबीन पिकाचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे.

वरोरा तालुक्‍यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वरोरा- वणी, लाडकी- सागरी- हिंगणघाट, मोकाळा, माढेळी हे मार्ग बंद आहेत. कोठारीतील फुकटनगर वसाहतीत 30 घरांमध्ये पाणी शिरले, तर 35 घरे पडली. कोठारी- कवडशी, कोठारी- काटवली, तोहोगाव, कोठारी- बल्लारपूर मार्ग बंद झाले आहेत. कोठारी, कवडजई, काटोली, बामणी, तोहोगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. येथील 30 कुटुंबांना शुक्रवारी रात्रीपासूनच शाळा- अंगणवाड्यांमध्ये हलविण्यात आले आहे. सास्ती परिसरातील चारली, निरली, धीडशी, कोलगाव, बाबापूर, मानवली, सास्ती, गोवरी या गावांचा संपर्क तुटला आहे. गोवरी, कोलगाव व सास्तीमध्ये अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. भद्रावती तालुक्‍यातील माजरी- वणी, माजरी- वरोरा, माजरी- भद्रावती हे मार्ग बंद आहेत. पिपरी (देशमुख) व कोची ही गावे पुराने वेढली आहेत. भद्रावतीतील डोलारा वार्डात आजही पाणी कायम होते. तालुक्‍यात आतापर्यंत 14 घरे पडल्याची नोंद आहे. माजरी क्षेत्रातील दोन भूमिगत व पाच ओपनकास्ट कोळसा खाणींचे उत्पादन ठप्प पडले आहे. त्यामुळे वेकोलीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

दरम्यान, सलग तिसऱ्यांदा पूर आल्यामुळे नुकसानीचा आलेख आणखी वाढलेला आहे. बल्लारपूर तालुक्‍यातील चारवट, गोंडपिपरी तालुक्‍यातील 13 गावे, पोंभुर्णा तालुक्‍यातील तीन गावे पुराने वेढली असली, तरी अद्याप त्यांचा संपर्क तुटलेला नाही. बोटींच्या साहाय्याने गावकऱ्यांना मदत पुरविली जात आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना 24 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.