देशातील अडीच लाख ग्रामपंचायती येत्या दोन वर्षात इंटरनेटच्या ब्रॉडबँड (१00 एमबीपीएस) कनेक्शनने जोडण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली.
सरकारने नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्कने देशातील सर्व ग्रामपंचायतींना जोडण्याची सरकारची योजना असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. डार्क फायबर नेटवर्कने १00 एमबीपीएसची गती गाठता येणार आहे. हायस्पिड ब्रॉडबँड कनेक्शनमुळे लोकांना टीव्हीवरील दृश्याप्रमाणे स्पष्ट व्हिडिओ पाहता येतील. या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंग सुद्धा करता येणार आहे. ग्रामपंचायतीमधील इंटरनेटच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ प्रशिक्षणामुळे लोकांना शिक्षित करण्यास मदत होणार आहे. या संपूर्ण योजनेसाठी २0 हजार कोटी रुपये खर्च येणार असून येत्या डिसेंबरपर्यंत देशातील ५ हजार ग्रामपंचायती ब्रॉडबँड इंटरनेटने जोडल्या जातील, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला.