সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 27, 2013

सिमावर्ती भागातील २१ मराठी शाळा बंद करण्याचा घाट

चंद्रपूर-  आंध्रप्रदेश राज्यातील सिमावर्ती भागातील २१ मराठी शाळा बंद करण्याचा घाट आंध्रप्रदेश सरकारने घातला आहे. चार मराठी शाळा दोन वर्षांपूर्वीच बंद झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या सिमेलागून असलेल्या आदिलाबाद जिल्ह्यात मोठय़ा संख्येने मराठी भाषिक वास्तव्याला आहेत. त्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता यावे, यासाठी या भागात मराठी शाळा उघडण्यात आल्या. मात्र येथील मराठी शाळांना आता अखेरची घरघर लागली आहे. आंध्रप्रदेश सरकारची मराठीविषयाची अनास्थाच याला कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. 
या भागात २५ प्राथमिक, आठ माध्यमिक व तीन कनिष्ठ मराठी महाविद्यालये आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थी संख्याही मोठी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हेतुपुरस्सर मराठी शिक्षकांची भरती केली जात नसल्याने या शाळा आता ओस पडू लागल्या आहेत, तर दुसरीकडे नवीन तेलगू शाळांना मान्यता देऊन मराठी विद्यार्थ्यांना तेलगू शाळांत प्रवेश घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे मराठी भाषेतील शिक्षणाची गोडी असूनही मराठी भाषिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांची तेथे गळचेपी होत आहे. यातील काही शाळा जीर्णावस्थेत उभ्या आहेत. त्याची डागडुजीही केली जात नसल्याने शाळांची अतिशय दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्र व आंध्र प्रदेशाच्या सिमावर्ती भागातील खोगदूर, बेला, मांगरुड, कोब्बई, भेदोडा, दहेगाव, टाकळी, जुनोनी, आदिलाबाद, सोनखास येथील शाळांत मराठी शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्जनात अडचणी येत आहेत.
या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी आदिलाबादेतील जिल्हा परिषदेसमोर मराठी शिक्षकांनी मोठे आंदोलन केले होते. मात्र आंदोलनादरम्यान केवळ पोकळ आश्‍वासनाशिवाय शिक्षकांच्या पदरी काहीही पडले नाही. शाळेच्या तुकड्यांमध्ये पूर्ण पटसंख्या असताना या शाळांकडे दुर्लक्ष करून तेलगू भाषेचे प्राबल्य वाढविण्यासाठी मराठी भाषेची गळचेपी केली, आरोप यामुळे होऊ लागला आहे.
एकीकडे महाराष्ट्र या मराठी भाषिकांच्या प्रदेशात विद्यार्थी मिळत नसल्याने मराठी शाळा बंद होत आहेत, तर दुसरीकडे तेलगू भाषिक आंध्रप्रदेशात विद्यार्थ्यांची पटसंख्या मराठीची अस्मिता टिकवून ठेऊन आहे.
आंध्रप्रदेशातील मराठी शाळांवर होणारा अन्याय महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारसमोर आणून दूर करावा, अशी मागणी आहे. 

मराठी शिक्षकांची पदोन्नती होत नसल्याने हे शिक्षक तेलगू शाळांतच शिकविणे पसंद करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद होण्यामागे मराठी माणसांचीही अनास्था कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.