चंद्रपूर : विद्यार्थीदशेतच सादर केलेल्या शोधप्रबंधामुळे नासा सारख्या जागतिक अवकाश संशोधन संस्थेने दखल घेतल्याबद्दल २८ ऑगस्ट रोजी केतन बच्चूवार याचा महानगरपालिकेच्या महापौर संगीता अमृतकर यांच्या हस्ते मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे.
दुर्गापूर येथील वेकोलिचे अभियंता श्रीकांत बच्चुवार यांचा मुलगा असलेला केतन याने वरंगलच्या एनआयटीतून बी.टेक.चे शिक्षण घेत असतानाच 'कॉम्प्युटर व्हीजन इमेज प्रोसेसिंग' या विषयावर आठ शोधप्रबंध सादर केले. त्यातील एका प्रबंधाची नासाने दखल घेतली. हा प्रबंध नासाच्या ग्रंथालयात अभ्यासासाठी ठेवण्यात आला आहे. केतनचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण दुर्गापूरच्या सेंट मेरीजमध्ये तर, बारावीचे शिक्षण हैदराबादच्या नारायणा विद्यालयात झाले. बी.टेक. करत असतानाच 'कॉम्प्युटर व्हीजन इमेज प्रोसेसिंग' या विषयावर केतनने आठ शोधप्रबंध सादर केले. यात दूर अंतरावरून उच्च दर्जाचे छायाचित्र घेणे, एखाद्या फोटोवर केलेली खोडतोड शोधण्यासाठी डिजीटल फारॅन्सीक, हस्तलिखित शब्द संगणकीयकृत करण्यासाठी इमेज सेग्मेंटेशन या प्रबंधांचा समावेश आहे.
केतनला 'मास्टर इन अल्पायईड मॅथेमॅटीक्स टू कॉम्प्युटर व्हीजन' या अभ्यासक्रमासाठी फ्रान्स शासनाने शिष्यवृत्ती दिली आहे. शोधप्रबंधामुळे सरळ द्वितीय वर्षात प्रवेश मिळाला असून, केतन हा वर्षभराच्या अभ्यासासाठी ३१ ऑगस्ट रोजी पॅरिसला रवाना होईल.