चंद्रपूर- आजूबाजूला असलेल्या जंगलातील प्राणी पान्या अभावी उन्हाळ्यात शहरी वस्तीकडे धाव घेतात. परिणामी मनुष्य-प्राणी संघर्षामुळे अनेकदा मनुष्य किंवा प्राणी निशाकरण बळी ठरतात. यासाठी जंगलातील जलसाठे संपूर्ण उन्हाळाभर कसे सुरक्षित ठेवता येतील यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते.
लोहारा जवळील जंगलात रेल्वे रूळा लागत मोठा नैसर्गिक तलाव आहे. हा तलाव लोहारा जुनोना मार्गावरील घनदाट जंगलातील वन्य प्राण्यांची तहान भागविणारा एक महत्वाचा जलसाठा आहे. वर्षभर येथे लक्षणीय प्रमाणात संरक्षित प्रजातीच्या वन्य प्राण्यांची भ्रमंती सुरु असते. यामुळे हा तलाव एक महत्वाचे स्थळ आहे. पण प्रत्येक वर्षी उन्हाळ्यातील काळात हा तलाव पूर्ण पाने आटतो.
या तलावाचे पाणी संपल्यावर उन्हाळ्यात प्राणी येथून पाण्याच्या शोधत बाहेर पडतात. जवळच असलेल्या लोह खनिज कारखाना व अष्टभुजा मदिर परिसरातील वस्ती मध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्या सोबत मानव संघर्ष होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या होत्या. जर जंगलातील पाणी साठे वर्षभर पुरले तर प्राणी बाहेर येणार नाहि. यामुळे मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष टळेल. दोन वर्षापूर्वी अष्टभुजा मंदिर परिसरात एका बिबट्याच्या पिल्लाला संतप्त जमावाने काठ्या व दगडांनी ठेचून मारले.
हे सर्व प्रकार बघता जंगलातील जलसाठे वर्षभर टिकविणे हे गरजेचे आहे.
या तलावाची खोली वाढविण्याच्या दृष्टीने या आधी विचार करण्यात आला पण तो प्रत्यक्षात होऊ शकला नाहि. अखेर सोपा व त्वरित उपाय म्हणून चंद्रपूर येथील ग्रीन प्ल्यानेट सोसायटी च्या कार्यकर्त्यांनी या तलावाची फुटलेली एक बाजू बुजवून पाणी अडविण्याचे ठरविले.
या योजनेवर दोन दिवस टप्प्या टप्प्याने काम करून अखेर तलावाचे पाणी वाहून जाणे थांबविण्यात आले. जवळच असलेले दगड व मुरूम याचा वापर करून येथे ९ ऑगस्ट ला बंधारा बांधण्यात आला.
जेथून एक मोठा पाण्याचा लोट वाहून जात होता त्या ठिकाणी बांध अडवणूक केल्याने पाणी जाणे बंद झाले आहे. परिणामी जलसाठ्यामध्ये ६ ते ८ इंच वाढ झाली असून हे पाणी जून च्या दुसर्या आठवड्या पर्यंत पुरावे अशी आशा व्यक्त होत आहे.
ग्रीन प्लानेट सोसायटी चे प्रा. सुरेश चोपणे व प्रा. सचिन वझलवार यांच्या सोबत दिनेश खाटे, तुषार लेनगुरे, जितु नोमुलवार, सचिन अटकारे, मंगेश येल्ललवार, विवेक शेंडे व इतर तरुणांनी श्रम दानातून हा बंधारा निर्माण केला.