तोडफोड-जाळपोळ नाही,
मनसेचा रास्तारोको प्रातिनिधीक;
राज वाशी टोलनाक्यावर करणार नेतृत्व!
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या (बुधवार) सकाळी नऊ वाजतापासून रस्तावर येणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. रविवारी पुण्याच्या सभेत त्यांनी 12 तारखेला राज्यभर रास्तारोको आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा केली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक गौप्यस्फोटही केला आहे. ते म्हणाले, सरकारच्या वतीने एका व्यक्तीने फोन केला होता, त्यांनी उद्याचे आंदोलन स्थगित करुन सरकारसोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. राज यांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळला असून उद्या राज्यातील सर्व महामार्गांवर मनसे कार्यकर्ते रास्तारोको करतील, राज्यातील जनतेनेही यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
उद्याच्या रास्तारोकोनंतर 21 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतरही सरकारने टोल बाबतची भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याचे सांगत पुन्हा एकदा खळ-खट्याक होणार असल्याचा सरकारला इशारा दिला आहे.