माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
चंद्रपूर - मोठे स्वप्न बघा. आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करा. संकुचित कल्पनांना थारा देऊ नका. त्या मर्यादा तोडा आणि तुम्ही जग बदलवा, असा कानमंत्र हजारो विद्यार्थ्यांना भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी दिला.
मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि खासदार हंसराज अहीर यांच्या वतीने येथील चांदा क्लब मैदानावर "युवा भारत समर्थ भारत-2020' हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वप्न बघा, ते प्रत्यक्षात उतरवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कलाम यांनी जवळपास पंचेचाळीस मिनिटे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इंग्रजीतून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मात्र, आपल्या भाषणाची सुरवात त्यांनी मराठीतून केली. "चंद्रपूरवासींना आणि विद्यार्थ्यांना भेटून मला खूप आनंद झाला' हे वाक्य मराठीत उच्चारत उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.
महान व्यक्ती त्यांच्यातील काही विशिष्ट गुणांमुळे वेगळे ठरतात. चंद्रपूरच्या युवकांनी हे कौशल्य अंगीकारून "अग्निपंख' मिळवावे. जीवनातील महान ध्येय निश्चित केली पाहिजे. ज्ञान संपादनाची लालसा बाळगली पाहिजे, असेही ते म्हणाले. शिक्षण हे व्यक्तीला उडायला पंख देत असते. विद्यार्थ्यांमध्ये चिरस्थायी चैतन्य आले पाहिजे. त्यासाठी आत्मशक्तीची जोड मिळाल्यास युवा जिंकत जाईल. थॉमस ऍडसीन, राइट बद्रर्स, रॉक कॅल्वीन, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, सीव्ही रमन, श्रीनिवासन रामानुजन, मादाम क्युरी या असामान्य लोकांनी लावलेल्या शोधांमधून मानव संस्कृती बदलून गेली. त्यामुळे हे सर्व महान विभुती वेगळ्या आहेत, असे माजी राष्ट्रपती कलाम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तत्पूर्वी एपीजे अब्दुल कलाम यांचा चंद्रपूरकरांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आयोजक अहीर यांच्यासोबत माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. रवींद्र भागवत आदी उपस्थित होते. संचालन प्रशांत आर्वे यांनी केले.