चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेत सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदलण्याचा सपाटाच सुरु झाला आहे. वर्षभरात ३ अधिकरी बदलले असून, आता पुन्हा नवा चेहरा येणार आहे.
कोणताही नवा अधिकारी आला की, त्यांना जिल्ह्याची ओळख, प्रशासकीय कामाची पद्धत जाणून घेऊन नवीन कार्याला सुरुवात करावी लागते. काहीसा असाच प्रकार गेल्या वर्षभरात रुजू झालेल्या मुख्य कार्यपालन अधिका-र्यांनी केला. मात्र विस्कटलेली घडी बसाविन्याआधीच खुर्ची सोडण्याची पाळी अधिका-यावर येत आहे.
मागील काळात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अरुण शिंदे होते. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करून हटविण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे यांच्यासह जि. प. सदस्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी सहा फेब्रुवारी 2013 रोजी नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर त्यांची शिंदे यांची अकोला जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. या पदाचा कार्यभार अतिरिक्त जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर यांच्याकडे बराच काळ होता. त्यानंतर मे महिन्यात डॉ. माधवी खोडे यांच्या रूपाने चंद्रपूरला पहिली महिला मुख्य कार्यपालन अधिकारी मिळाली. मात्र, त्यांनाही जास्त दिवस खुर्चीवर बसता आले नाही. त्यामुळे पुन्हा प्रभार डहाळकर यांच्याकडे गेला. त्यानंतर ५ सप्टेंबर २०१३ रोजी नाशिक आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत संपदा मेहता यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. पदभार स्वीकारून काही दिवस होत नाहीतोच अवघ्या चार महिन्यात त्यांची बदली गडचिरोली येथे झाली आहे. आता त्यांच्या जागी ग्रामविकास विभागाचे उपसचिव एम. एस. कलशेट्टी येत आहेत.
यूपीएससी परीक्षेत राज्यातील चौसष्ट विद्यार्थ्यांत पहिल्या आलेल्या पुण्याच्या संपदा मेहता या देशातही 21व्या क्रमांकावर होत्या. त्याच्या रूपाने चंद्रपूर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यपालन अधिकारी हुशार अधिकारी मिळाला होता. पण काय करणार शासन निर्णयामुळे अधिकारी वर्गाला विकास करण्यापूर्वीच आल्या पावली परत जावे लागत आहे.