पंढरपूर, १ फेबु्रवारी
पंढरपूर येथील शं. ना. नवरे नाट्यनगरीत आज अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते थाटात उद्घाटन झाले. ‘मी जर राजकारणात गेलो नसतो, तर रंगभूमी निश्चितच गाजवली असती,’ असे मनोगत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
येथील टिळक स्मारक मैदानावरून या संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेली नाट्यदिंडी आज सकाळी निघाली. शहरातील विविध मार्गावरून निघालेल्या या नाट्यदिंडीने पंढरपूरवासीयांची मने जिंकली. दिंडीनंतर नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा प्रारंभ झाला. नाट्यसंमेलनाचे उद्घाटक गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष मोहन आगाशे, संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, रिपाइं नेते खासदार रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सोलापुरातील अनेक कलावंतांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. येथे होत असलेले हे तिसरे नाट्यसंमेलन आहे, याकडे लक्ष वेधत, ‘मी जर राजकारणात आलो नसतो, तर नक्कीच मराठी रंगभूमी गाजवली असती आणि मोहन जोशी यांच्याविरोधात नाट्यपरिषदेची निवडणूक लढविली असती. मोहन जोशी हे कामगार रंगभूमीवरून आले आहेत आणि मीदेखील आयुष्यातील पहिले नाटक कामगार रंगभूमीवरच केले होते,’ असे सांगताना, कामगारांच्या यातना काय असतात, याची जोशी यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचे धाडस मी केलेही नसते, असे शिंदे यांनी हसतच सांगितले. भागवत धर्माचे पीठ असलेल्या या नाट्यसंमेलनात रंग देवतेची पूजा करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे, असेही शिंदे म्हणाले.
‘मुंबईची माणसे’ या नाटकात स्त्रीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली होती, अशी आठवण करताना, त्या काळात मी अनेक नाटके केलीत. त्या दिवसांच्या आठवणी आज या व्यासपीठावर पुन्हा एकदा ताज्या झाल्या, असे शिंदे म्हणाले. शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठी रंगभूमीच्या देदिप्यमान इतिहासाचा आढावा घेताना प्रायोगिक, व्यावसायिक आणि दलित रंगभूमीचा उल्लेख केला. पडद्यामागे काम करणार्यांची भूमिकाही तितकीच मोठी असते, असे सांगण्यासही ते विसरले नाही. नाटकाने करमणूक करायलाच हवी. पण, त्याचवेळी संस्कृतीचे सोनेही लुटायला हवे. हे काम एकाच रात्रीत होणे शक्य नाही, असे सांगतानाच, नव्या प्रतिभेच्या कलावंतांना वाव देऊन त्यांची रुजवण करण्याच्या गरजेवरही शिंदे यांनी भर दिला.