সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 24, 2014

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सद्यःस्थिती

हतबल कॉंग्रेस, सावध भाजप, उत्साही आप...
                                     

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सद्यःस्थिती हतबल कॉंग्रेस, सावध भाजप, उत्साही आप अशी आहे. या मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेस अशीच पारंपरिक लढत आजवर होत आली. स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष ऍड. वामनराव चटप यांनी हातात "झाडू' घेण्याचे निश्‍चित केले. त्यामुळे मतदारसंघातील लढतीचे चित्र आता तिरंगी होईल, यावर राजकीय जाणकारांचे एकमत आहे. 
- प्रमोद काकडे 

(lलेखक सकाळ चंद्रपूरचे वरिष्ठ बातमीदार आहेत)

देशभरात कॉंग्रेसविरोधी वातावरण आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या लोकसभेतील कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्तेही हतबल झाले. चंद्रपूरमध्ये मागील वेळी भाजपचे हंसराज अहीर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नरेश पुगलिया यांचा केवळ 3.62 टक्‍के मतांनी पराभव केला. तेव्हा पुगलिया यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी होती. पक्षांतर्गत विरोध होता. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या एका गटाने भाजपला खुल्या दिलाने मदत केली. तरीही पुगलिया विजयाच्या जवळ पोचले. ही पार्श्‍वभूमी पाहता भाजपसाठी देशभरात अनुकूल वातावरण आहे, अशी हवा असली तरी अहीर सावध आहेत. या मतदारसंघात नेहमीच कॉंग्रेसने कॉंग्रेसला पराभूत केले आहे! सलग दोन पराभव झालेल्या पुगलियांना आता उमेदवारी मिळणार नाही, असे बोलले जात आहे. पालकमंत्री संजय देवतळे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. "कोलगेट' प्रकरणात अहीर यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली. मात्र या प्रसिद्धीचा लाभ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात त्यांना होईल, याची सुतराम शक्‍यता नाही. उलट "कोळसा आणि अहीर" यांच्या संबंधांवर मतदारांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. कॉंग्रेसने याच मुद्यावरून अलीकडेच अहीर यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांचे अहीर खंडन करू शकले नाहीत. नुकताच माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा कार्यक्रम घेऊन अप्रत्यक्षरीत्या अहीर यांनी प्रचाराचा नारळ फोडला. "इमेज बिल्डिंग' करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग होता. मात्र, सलग दहा वर्षे खासदार असलेल्या अहीर यांना प्रस्थापितांच्या विरोधातील लाटेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. भाजपमध्येही गटातटाचे राजकारण काही दिवसांपूर्वी उफाळून आले. चंद्रपूर महापालिकेतील 18 पैकी 13 नगरसेवकांनी आमदार आणि खासदाराविरोधात उघड बंड पुकारले. ते आता शांत झाले असले, तरी धग कायम आहे. 

शिवसेना मागच्या निवडणुकीत अहीर यांच्या विरोधात होती. सेनेने ऍड. चटप यांना मदत केली होती. याही वेळी त्यांची हीच भूमिका असेल, अशी परिस्थिती आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे चटप यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत एक लाख 70 हजार मते घेतली होती. या वेळी त्यांनी "झाडू' हातात घेण्याचे निश्‍चित केले. त्यामुळे आता या मतदारसंघातील लढतीचे चित्र तिरंगी होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. चटप यांची प्रतिमा स्वच्छ, अभ्यासू आणि प्रामाणिक नेता अशी आहे. जिल्ह्यात दोन लाख 30 हजार नवमतदार वाढले आहे. हे नवमतदार या वेळी महत्त्वाची भूमिका बजावतील. मात्र, अहीर वगळता उमेदवारीचे चित्र अद्याप अस्पष्ट असल्याने मतदारही संभ्रमातच आहेत. "मनसे'ही या वेळी उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका भाजपलाच सहन करावा लागेल. बसप आणि इतर छोट्या पक्षांनी मिळून मागील वेळी 17.60 टक्‍के मते घेतली होती. या मतांमध्ये आता वाढ होण्याची स्थिती नाही. गेल्या निवडणुकीनंतर मतदारसंघात फारशी राजकीय स्थित्यंतरे झालेली नाहीत. पराभवानंतर पुन्हा निवडणूक लढण्याची घोषणा ऍड. चटप यांनी केली. मात्र, त्यांनी पक्ष संघटना वाढविली नाही. कार्यकर्ते तयार केलेले नाहीत व केवळ स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनातून प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न केला. गेल्या निवडणुकीत अहीर यांची बरीचशी मते चटप यांच्याकडे वळली होती. यापासून धडा घेत अहीर यांनी ग्रामीण भागात जाणीवपूर्वक संपर्क वाढविला. उलट पुगलिया यांनी चंद्रपुरात अडीचशे कोटी रुपयांचा निधी मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, वरोऱ्याचे आमदार संजय देवतळे पालकमंत्री झाले. कॉंग्रेसला लोकसभेचा नवा उमेदवार मिळाला, अशी तेव्हापासून चर्चा होती. मात्र, ते जिल्ह्याचे नेते होऊ शकले नाहीत. अलीकडेच कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा वाद उफाळून आला. अद्यापही हे वादळ शमले नाही. 

पुगलिया गट देवतळे यांना अपशकुन करण्यासाठी टपलेलाच आहे. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी केवळ दोनच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. उर्वरित मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत. या मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यानंतर दलित, मुस्लिम आणि आदिवासी मतदारांचा क्रमांक येतो. ओबीसी मतदार भाजपच्या पाठीशी उभे राहतात, तर मुस्लिम आणि दलित कॉंग्रेसच्या. मतदारसंघातील काही भागांत प्रदूषण ही मोठी समस्या आहे. ती अद्याप राजकीय विषयपत्रिकेवर आली नाही. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न आहेत. नव्या उद्योगांमुळे शेतकरी आणि उद्योग, असा संघर्ष निर्माण झाला आहे. "वेकोलिक'डून होणाऱ्या या भूमिअधिग्रहणाचाही प्रश्‍न आ वासून उभा आहे. अतिवृष्टीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसून, त्याचा रोष शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, हा असंतोष कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरोधातील मतदानात होईल, याबाबत राजकीय जाणकारांचे एकमत नाही. 

लोकसभा 2009 चा निकाल एकूण मतदान - 8,98,515 (58.48%) 
हंसराज अहिर, भाजप - 3,01,467 (33.55%) 
नरेश पुगलिया, कॉंग्रेस - 2,68,972 (29.93%) 
वामनराव चटप -स्वभाप -1,69,112 (18.82%) 
दत्ताभाऊ हजारे -बसप - 57,519 (6.40%) 

विद्यमान आमदार राजोरा- सुभाष धोटे (कॉंग्रेस) 
चंद्रपूर- नानाजी शामकुळे (भाजप) 
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार (भाजप) 
वरोरा- संजय देवतळे (कॉंग्रेस) 
वणी- वामनराव कासावार (कॉंग्रेस) 
आर्णी- शिवाजीराव मोघे (कॉंग्रेस)

मतदार म्हणतात... कोळसा खाणी आणि इतर उद्योगांमुळे होणारे प्रदूषण रोखावे. 
शेतजमिनीला योग्य भाव मिळावा. 
वनकायद्याने अडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत व शेतीच्या पाण्याची समस्या सुटण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
रस्ते "टोल फ्री' होण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा. 
उड्डाणपुलांची कामे मार्गी लावावीत व शहरातील वाहतुकीची समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
---------------------------------------------------------------------


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.