विट प्रकल्पातून दिला स्थानिकांना रोजगार
जिल्ह्यात पाच प्रकल्प कार्यान्वित
नागपूर, ता.27 - उद्योग व कारखान्याच्या बाबातीत गडचिरोली जिल्हा हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बराच मागे आहे. येथे नैसर्गिक स्त्रोतांचा मोठा खजिना असून घनदाट हिरवे जंगल व बारमाही वाहणा-या नद्यांचा हा परिसर आहे. याच स्त्रोतांचा उपयोग करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी येथील वनविभागाने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाला कोणतिही हानी न पोहचविता बांबुच्या राखेपासून पर्यावरणपुरक विट निर्मितीचे जिल्ह्यात पाच प्रकल्प कार्यान्वित करून वन विभागाने येथील नागरीकांचे जिवनमान उंचविण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.
बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील पेपर मिल इंडस्ट्री लिमिटेड हा विदर्भातील कागद निर्मितीचा एक मोठा उद्योग मानला जातो. या पेपर मिल अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आष्टी पेपर मिल कार्यरत आहे. बाबूंपासून पेपर तयार केल्यानंतर मिलमधून मोफत मिळणा-या राखेपासून जिल्ह्यात उद्योग उभारावा, यासाठी वनविभागाने चामोर्शी, मार्कंडा (आष्टी), एटापल्ली, सिरोंचा आणि कुरखेडा येथे विट निर्मितीचे प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पामुळे जवळपास 75 नागरीकांना वनविभागाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. चामोर्शी येथील विट व टाईल्स निर्मितीसाठी वनविभागाने 12 लक्ष रूपयांच्या दोन मशीन खरेदी केल्या आहेत. या प्रकल्पात एकूण 15 मजूर कार्यरत असून प्रत्येक मजुराला एका दिवसाची 250 रूपये मजुरी दिली जाते. विशेष म्हणजे वनविभागाच्या जागेवर हा प्रकल्प कार्यान्वित असून पर्यावरणाला कोणतिही हानी होत नाही. जयनगर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हा प्रकल्प चालविण्यासाठी देण्यात आला आहे. या समितीमध्ये संपुर्ण गावातील नागरीक सभासद असल्यामुळे लोकसहभागातून वनविभागाने उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे.
या प्रकल्पासाठी वनविभागाला आष्टी पेपर मिल मधून मोफत राख पुरविली जाते. एका महिण्याला दहा ट्रक राख आणण्याचा खर्च 20 हजार रूपये (2 हजार रूपये प्रति ट्रक) आहे. या महिण्याकाठी एक टन चुना (किंमत 4 हजार रूपये) दहा हजार रूपयांची दहा ट्रक रेती, 35 हजार रूपयांच्या सिंमेटच्या 100 बॅग, महिण्याचे विद्युत बिल 3 हजार रूपये आणि 250 रूपये प्रति दिवसांप्रमाणे 15 मजुरांची एक महिण्याची मजुरी 1 लक्ष 12 हजार 500 रूपये या प्रमाणे महिण्याचा एकूण लागत खर्च 1 लक्ष 87 हजार 500 रूपये आहे.
या प्रकल्पातील विटांच्या आणि टाईल्सच्या विक्रीतून दर महिण्याला 2 लक्ष 70 हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. लागत खर्च वजा करता या प्रकल्पातून महिण्याला जवळपास 80 ते 85 हजार निवळ नफा मिळत आहे. हा नफा सुध्दा मजुरांना बोनस म्हणून देण्याचा वन विभागाचा मानस आहे.
चामोर्शी येथील प्रकल्पात एक विट तयार करण्यासाठी 1.866 कि.ग्रॅ. राख, 0.666 ग्रॅ. चुना, 3.666 कि.ग्रॅ. रेती आणि 0.133 ग्रॅ. सिमेंटचे मिश्रण तयार केले जाते. येथे तयार होणारी मोठी विट 9 इंच लांबी, 6 इंच उंची आणि 3 इंच रूंद असून तिचे वजन 5.50 कि.ग्रॅ. आहे. तर छोट्या विटेचा आकार 9 इंच लांबी, 4 इंच उंची, आणि 3 इंच रूंदीचे आहे. छोट्या विटेचे वजन 3.50 कि.ग्रॅ. असून या प्रकल्पात प्रत्येक दिवशी 3 हजार मोठ्या विट्या आणि दीड हजार छोट्या विटांची निर्मिती केली जाते.
जिल्ह्यातील इतरही प्रकल्पात विट निर्मितीचे काम जोमाने सुरू असून तीन महिण्यात दोन लक्ष विटांची मागणी पुर्ण करण्यात आली आहे. तसेच सध्या स्थितीत संपुर्ण जिल्ह्यात 25 लक्ष विटांची मागणी आहे. जिल्ह्यात विटांची मागणी जास्त असून पुरवठा कमी होत असल्यामुळे यासारखे मोठे प्रकल्प कार्यान्वित करून आणखी रोजगार निर्मितीसाठी वन विभाग प्रयत्नशिल आहे.