डॉ. रमेश बांडेबुचे, चिमूरच्या भूकर मापक कर्मचा-यांचे प्रकरण
चंद्रपूर : लाचप्रकरणात अटक झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने
शासनाकडे मंजुरी आदेशासाठी पाठविलेले जिल्ह्यातील दोन लाच प्रकरणे ३१ नोव्हेंबर २०१३
पर्यंत शासनाकडे ९० दिवसांपेक्षा जास्त काळ होऊनही प्रलंबित आहेत. यात चिमुरातील उपअधीक्षक
भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि बहुचर्चित डॉ. रमेश बांडेबुचे लाचप्रकरणाचा
समावेश आहे.
वैद्यकीय बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी शिक्षकाकडून दोन
हजार ८०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहा जानेवारी २०११ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे
शिपाई श्रीधर मेमन याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही लाच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रमेश
बांडेबुचे यांच्या सूचनेवरून स्वीकारल्याचे मेननने मान्य केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या अधिका-यांनी जिल्हा शल्यचिकित्सक बांडेबुचे यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर
हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र,
कायद्यानुसार ९० दिवसांपेक्षा
जास्त कालावधी उलटूनही शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता जिल्हा शल्यचिकित्सक
सेवेतून निवृत्त झाले आहेत.
दुस-या
एका प्रकरणात ४ डिसेंबर २०१२ रोजी ३५ वर्षांपूर्वी घेतलेली कृषक शेतजमीन अकृषक करण्यासाठी
सहा हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक देवेंद्रकुमार
प्रभानंद कटरे, संजय महादेव कोरे यांना अटक करण्यात आली. हे प्रकरणसुद्धा शासनाकडे मंजुरी आदेशासाठी
प्रलंबित आहे. राज्यात एकूण ५१ प्रकरणे प्रलंबित असून, २०११ मधील १, २०१२ मधील ५ आणि २०१३ मधील
४५ प्रकरणांचा समावेश आहे. उघड चौकशीकरिता मंजुरी आदेशासाठी राज्यात एकूण आठ प्रकरणे
प्रलंबित आहेत.
१३९ प्रकरणे विशेष न्यायालयात प्रलंबित
१९८६ ते २०१३ पर्यंत विशेष न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या राज्यात २२५१ इतकी आहे. यात नागपूर विभागातील ४५४ प्रकरणांचा समावेश असून, चंद्रपूर विशेष न्यायालयात १२१, तर वरोरा येथे १८ प्रकरणे प्रलंबित आहेत.