चंद्रपूर, १४ डिसेंबर
अनेक वर्षापासून चंद्रपूरकर प्रदूषणामुळे त्रस्त आहे. चंद्रपूर शहर प्रदूषणात महाराष्ट्रात प्रथम व भारतात दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने ‘प्रदूषण हटाव-चंद्रपूर बचाव’ या मागणीसाठी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता येथील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली निघाली.
हवेत १६० मायक्रोग्रॅम दूषित कण राहू शकतात. परंतु, चंद्रपुरात १००० ते १५०० मायक्रोग्रॅम दूषित कण आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील नागरिकांमध्ये दमा, श्वासाचे आजार, हदयरोग, चर्मरोग, क्षयरोग, कर्करोग आदी आजाराचे प्रमाण वाढले आहे. आंतराष्ट्रीय हदयरोग तज्ज्ञ डॉ. नरेश त्रेहाणच्या अहवाला प्रमाणे जिथे प्रदूषण अधिक असते, तिथे हदयरोगाचे प्रमाणही अधिक असते. सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी २००८-२०१० व २०१० ते २०१२ साठी ऍक्शन प्लॉन बनविला. केंद्र सरकारने केंद्रीय प्रदूषण मंडळाचे अतिरिक्त संचालक डॉ. बाला यांना पाठविले. मात्र, त्यांनी केलेली सूचना व ऍक्शन प्लॉनसुध्दा राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे अमलात येवू शकला नाही आणि चंद्रपूरचे प्रदूषण कमी झाले नाही. सर्व डोळ्याने दिसत असताना आता सरकारने नीरी व आयआयटी संस्थेला अहवाल द्यायला सांगितले आहे. त्यामुळे महाऔष्णिक वीज केंद्रातील ४ संचातून निघणार धूर बंद करण्यात यावा, वेकोलिमुळे व अन्य कारणामुळे होणारे प्रदूषण त्वरित थांबवावे या मागणीसाठी या महारॅलीचे आयोजन करण्यात आले.
या महारॅलीत चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, ग्रीन प्लॅनेट, इको प्रो, रोटरी क्लब, आयएमए, बार असोसिएशन, वृक्षाई, ज्येष्ठ नागरिक संघ, चेंबर ऑफ कॉमर्स, पृथ्वीमित्र संस्था, प्रहार, विविध राज्य कर्मचारी संघटना, आंगनवाडी कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रीन मिशन सीटी, व्यापारी महासंघ सहभागी झाले होते.