परतूर मधील पत्रकार परिषदेत दिली माहिती
परभणी/गोविंद मठपती:जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ज्यांची सर्वदुर ओळख असलेले माजी आमदार रामप्रसादजी यांनी असंख्य सहका-यांना घेऊन
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर परभणी लोकसभा मतदार संघात पक्षाचे संघटन वाढविने ही आपली प्राथमिकता होती. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण मतदार संघातील गावागावात जाऊन भाजपा सरकारच्या विविध योजननांची माहिती आपण जनतेपर्यंत पोहचविली आहे. आगामी काळात पक्षाने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिल्यास संधीचे सोने करून परभणीची जागा भाजपकडे खेचून आणू असे मत भाजपच्या इच्छूक उमेदवार मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी व्यक्त केले. रविवारी एका सामाजिक उपक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्या लोकसभा मतदारसंघातील परतूर मध्ये आल्या होत्या. येथील आदिवासी आश्रम शाळेत जालना येथील उद्योगपती छोटूभाई यांच्या वतीने मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप करण्यात आले. यानंतर येथील हॉटेल कृष्णमोती मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सेलू बाजारसमितीचे सभापती रविंद्र डासाळकर, शेख सगीर, विलास सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, अशोक सेलवाडीकर, नाईकवाडे अण्णा, आदीची उपस्थिती होती.
लोकसभेची उमेदवारी मागणार्या इच्छुकांची संख्या आजघडीला मोठी असली तरी, उमेदवारची निवडून येण्याची क्षमता पाहूनच कोणाला संधी द्यायची याचा निर्णय पक्ष पातळीवर घेतला जात असतो. परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघासह जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी मतदार संघात २०१२ पासून आपला सतत जनसंपर्क आहे. आगामी काळात संपूर्ण लोकसभा मतदार संघात जनसंपर्क अभियान राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या १५ ते २० वर्षापासून परभणी लोकसभेच्या जागेवर सेनेचा उमेदवार विजयी होतो, मात्र विकासात्मक कामाच्या बाबतीत कुठेही समाधानकारक बाब पाहावयास मिळत नाही. रस्ते,वीज, रेल्वे आदी बाबतीत अनेक समस्या मतदार संघात भेडसावत आहेत. आपण उच्च शिक्षित असल्याने, तसेच अनेक दिवसांपासून लोकसभा मतदार संघातील सर्व समस्यांची आपल्याला जाण आहे. असे सांगत आपणच प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट केले.
लोकसभा मतदार संघाच्या विकासाची ब्लुप्रिंट तयार असल्याचे सांगून
ती योग्य वेळी बाहेर काढणार असल्याचे यावेळी सांगितले.
सोशल मीडियावर राहुल लोणीकरांचा भावी खासदार म्हणून कार्यकर्ते गवगवा करत असल्याबाबत बोर्डीकर यांना छेडले असता, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता भावी, आमदार- खासदार व्हावा असे वाटत असते. लोकसभेच्या दृष्टीने विचार केल्यास एका विधानसभा मतदार संघात ताकत असून चालत नाही. संपूर्ण लोकसभा मतदार संघात चांगला संपर्क असावा लागतो. पक्षाने कोणताही उमेदवार दिल्यास पक्षाच्या विजयासाठी सर्व ताकतीनिशी प्रयत्न करू असेही त्यांनी संगितले.
पंढरपुरची वारी फेम, दहीहंडी फोडणे आणि मतदार संघात सभा मंडप उभा करणे या शिवाय इतरही अनेक कामे खासदारांची असतात, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगत विद्यमान खासदार संजय जाधव यांचे नाव न घेता त्यांना टोमणा मारला.
दरम्यान परतूर तालुक्यातील भाजपाच्या एका बड्या नेताने गडकरीच्या दौऱ्यानंतर परभणी जिल्ह्यात आपला संपर्क वाढविला आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावने, पक्षातील पदाधिकाऱ्यांना डावलून सोय-याधाय-या भेटीगाठीचा सपाटा त्यांनी लावला होता.रविवार
च्या मेघना बोर्डीकरांच्या या दौ-याने संबंधिताला मोठी चपराकच बसली असे मानले जात आहे.