সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 23, 2018

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रास स्कॉच अवार्ड



नागपूर दि. २३ : आदिवासी भागात बांबूच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची नवी दालने उपलब्ध करुन देणाऱ्या राज्यातील पहिल्या चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘स्कॉच अवार्ड २०१८’ च्या सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील (आयएफएस) यांनी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष समारंभात हा पुरस्कार स्वीकारला.

आदिवासी बहुल भागात रोजगार निर्मितीकरिता बांबू या माध्यमाचा वापर करण्यात आला. वन विभागाच्या सहकार्याने बांबूपासून विविध वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा राज्यातील पहिला प्रकल्प चंद्रपूर येथे सुरु करण्यात आला. या प्रकल्पाद्वारे महिला बचत गट यांच्यासह आदिवासी भागातील बेरोजगार युवक-युवतींना बांबूपासून विविध वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. आदिवासी भागात सुरु करण्यात आलेल्या रोजगारभिमुख बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्कॉचने दखल घेतली असून या केंद्रास स्कॉचच्या सुवर्ण अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात ४ डिसेंबर २०१४ रोजी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ तसेच महाराष्ट्र वन विभागामार्फत संशोधन, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा आणि क्षमता बांधणी हा उद्देश्य राखून केंद्राचे कामकाज सुरु करण्यात आले. चंद्रपूर-गडचिरोली व आसपासच्या परिसरातील नव उद्योजकांसाठी कौशल्य विकासाचे प्रमुख केंद्र बनत आहे. त्याशिवाय ईशान्य भारतासह चीन, जापान, व अन्य बांबू उत्पादित देशही या केंद्राशी जोडले जात आहेत.

केंद्राच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार महिलांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत. त्यामुळे उत्पादनासह बांबू उद्योगास चालना मिळण्यास मदत झाली आहे. विक्री केंद्र, ऑनलाईन शॉपींग संस्थांचे सहकार्य यासोबतच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, चंद्रपूर , विसापूर ,पोंभुरणा, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती , महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सुरु करण्यात आलेल्या बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

या ठिकाणी तयार झालेला तिरंगा ध्वज हा देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात फडकला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत या ठिकाणच्या वस्तू पोहोचल्या आहेत.

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मिळालेले राष्ट्रीयस्तरावर ‘स्कॉच अवार्ड २०१८’ सुवर्ण पदक पुरस्कार ही गौरवास्पद बाब आहे. राज्यातील पहिल्याबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रास मिळालेल्या पुरस्काराने येथे मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. या संस्थेची उतरोत्तर अशीच प्रगती होत राहो, बीआरटीसी ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावरुपास यावी, यासाठी आमची चमू अथक परिश्रम करेल. असा विश्वास बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील (आयएफएस) यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.