राज्याच्या सिंचन क्षमतेतही लक्षणीय वाढ
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळ मुक्त करणार
Ø वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मितीचा प्रश्नही लवकरच मार्गी
मुंबई, दि. २३: केंद्र शासनाच्या मदतीने राज्यात जलसिंचनाची व रस्ते विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असून राज्याच्या विकासाचा वेग वाढला आहे. 2019 पर्यंत राज्याच्या सिंचन क्षमतेत भरीव वाढ होईल असा विश्वास व्यक्त करत जलयुक्त शिवार, उरमोडी, जिहे-कटापूर योजनांच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील मेडीकल कॉलेजच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागला असून एक महिन्याच्या आत पदनिर्मितीचे काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील खंबाटकी घाट परिसरातील नवीन सहा मार्गिका बोगदा (३ मार्गिका जुळे बोगदे) पोहोच रस्त्यासहित तसेच हेळवाक ते कराड सेक्शन व सातारा ते म्हसवड सेक्शनच्या दुपदरीकरण या कामांचा कोनशिला अनावरण आणि धोम बलकवडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी होते.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, खा. उदयनराजे भोसले, खा.विजयसिंह मोहिते-पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ .अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आमदार सर्वश्री. शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, शंभूराज देसाई,दीपक चव्हाण, सातारा शहराच्या नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते महामार्ग व सिंचनासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, प्रधानमंत्री सिंचन योजना आणि बळीराजा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी राज्यासाठी देत आहे. त्यामुळे राज्यात सिंचनाची अनेक कामे सुरू आहेत. जलसंपदा विभागात वेगाने कामे होण्याबरोबरच पारदर्शक कामांवर भर दिला आहे. या विभागात ६३ टक्के बिलो टेंडर पध्दतीने कामे सुरू आहेत. या निमित्ताने नवी पारदर्शक कार्यसंस्कृती राज्यात निर्माण झाली आहे.
कृष्णा-भीमा खोऱ्यात दोन प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यात ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यावर शासनाचा भर आहे. येत्या काळात पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. राज्यातील वीजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १ लाख सौर पंपाचे वितरण केले जाणार आहे. तातडीने नव्या वीज जोडण्या देण्यात येणार आहेत. वीज बिल थकीत असल्यामुळे उपसा सिंचन योजना कार्यान्वित ठेवण्यात मोठे प्रश्न निर्माण होत असल्यामुळे सर्व उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर आणण्यात येणार आहेत.
राज्य शासनाने पिण्याच्या पाण्यांच्या योजनांवर मोठे काम केले असल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, सध्या ८ हजार पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे काम पूर्ण झाले असून नवीन १० हजार योजनांचे काम सुरू आहे. जलयुक्त शिवार, जिहे-कटापूर, उरमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळ मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय मार्ग चार पटीने वाढले
राज्यात रस्ते विकासांची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यापूर्वी केवळ ५ हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग राज्यात होते. गेल्या चार वर्षात यात चार पटीने वाढ झाली आहे. राज्य महामार्गांचे १० हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात राज्यात रस्त्यांचे चांगले जाळे निर्माण होऊन राज्याच्या विकासाला चालना मिळेल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. खंबाटकी घाटातील बोगद्याच्या नव्या सहा मार्गिकेमुळे अपघात प्रवणक्षेत्रात होणाऱ्या अपघातात मोठी घट होईल.शिवाय प्रवासाचा वेळही वाचणार आहे. त्याचबरोबर मुंबई खोपोली मार्गावर ८ किलोमीटर लांबीचे बोगदे आणि ४ किलोमीटर लांबीच्या केबल ब्रीजचे कामही सुरू करण्यात येणार असून मुंबई-बंगळूरू कॉरीडॉरच्या विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर निर्मितीपेक्षा इथेनॉल निर्मितीकडे वळावे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले, पाण्याची उपलब्धता वाढली की शेतकरी ऊस पीकाकडे वळतो. त्यामुळे गेल्या काही दिवसात अतिरिक्त साखर उत्पादनाचा मोठा प्रश्ना आपल्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे येत्या काळात नव्या साखर कारखान्यांना परवानगी न देण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागेल.
साखर उद्योगासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नवे मॉलॅसिस धोरण तयार केले आहे. यापुढे उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल वापरावर भर द्यावा लागणार आहे. भारत सरकार इथेनॉलची खरेदी करण्यासाठी तयार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी व कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीकडे वळले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीत बदल करण्याची गरज आहे.
केंद्राच्या माध्यमातून राज्यात रस्ते विकासाचे मोठे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगत श्री गडकरी पुढे म्हणाले, राज्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ५ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक कामे सुरू आहेत. रस्ते विकासाबरोबरच प्रधानमंत्री सिंचन योजना व बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची मोठी कामे सुरू आहेत. राज्यातील अर्धवट स्थितीत राहिलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन आवश्यक तो सर्व निधी देण्यास तयार आहे. राज्यात रस्ते विकासाबरोबरच जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी १७० ब्रीज कम बंधाऱ्यांचे काम सूरू आहे. या माध्यमातून राज्याची सिंचन क्षमता ५० टक्यांपर्यंत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठे काम झाले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून १ लाख ६ हजार कोटी रुपये रस्ते विकासासाठी राज्याला मिळाले आहेत. या माध्यमातून राज्यातील रस्त्यांचा मोठा विकास झाला आहे.
जलसंपदामंत्री गिरीष महाजन म्हणाले, सातारा जिल्ह्यासाठी हा दिवस वचनपूर्तीचा आहे. राज्यासह देशात रस्त्यांच्या कामांचा मोठा वेग आहे. शहरीभागासह ग्रामीण भागातील विकास कामांचा वेग वाढला आहे. राज्याच्या विकासासाठी अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, सातारा जिल्ह्यासाठी हा सोनियाचा दिवस आहे. जिल्ह्यासाठी अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न या निमित्ताने मार्गी लागले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागले आहेत. मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल राज्य शासनाचे मराठा समाच्यावतीने त्यांनी विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे डी. ओ. तावडे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खंबाटकी बोगद्याच्या मार्गिका कोनशीलचे डिजीटल कळ दाबून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच धोम बलकवडी मुख्य प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे डिजीटल कळ दाबून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी खंबाटकी बोगद्याच्या प्रस्तावित कामाचा तसेच धोम बलकवडी प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने सातारा जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानावरील कॉफी टेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. आभार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आयुष्यमान श्रीवास्तव यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.