नागपूर - जागतिक मराठी अकादमीच्या वतीने ४-५ आणि ६ जानेवारीला नागपूरच्या वनामती सभागृहात जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे हे १६ वे वर्ष असून यामध्ये देशातील आणि परदेशातील यशस्वी मराठी माणसांचा गौरव केला जाणार आहे.
जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित सोळाव्या जागतिक मराठी संमेलनात 'शोध मराठी मनाचा' या शीर्षकाखाली अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आपल्या देशातील काही मराठी लोक परदेशात वास्तव्याला आहेत. त्यांनी परदेशात विपरीत परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. त्यांचे १ संमेलन दरवर्षी महाराष्ट्रात आयोजित करण्यात येते. शोध मराठी मनाचा या संकल्पनेनुसार या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या संमेलनात विविध देशातील ज्या मराठी बांधवांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांना आमंत्रित केले जाते. त्यांचे यश आणि अनुभव तरुण पिढीला कळावे हाच या मागचा मुख्य उद्देश आहे.
संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार असून यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत देखील आयोजित करण्यात आलेली आहे. उद्घाटनानंतर ज्येष्ठ कवी आणि चित्रपट निर्माते रामदास फुटाणे आणि बांधकाम उद्योजक आशुतोष शेवाळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
सोळाव्या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्ताने सलग ३ दिवस नागपूरकरांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार असल्याने नागपूरकरांना आत्तापासूनच या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिलेली आहे.