मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा
धुळे, दि. 26 : दोंडाईचा नगरपरिषदेच्या सुसज्ज इमारतीमुळे आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून प्रभावीपणे आणि गतिशील काम करून नागरिकांची अपेक्षापूर्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहर विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा, नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन, विविध सभागृहांचे उद्घाटन आणि फिरता दवाखाना सुविधेचा प्रारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यानंतर दादासाहेब रावल स्टेडिअममध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम,दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उद्योगपती सरकारसाहेब रावल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दोंडाईचा शहराच्या पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. सांडपाणी पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापनाकडे नगरपरिषदेने लक्ष देऊन स्वच्छ व सुंदर शहर करावे. त्यासाठी आवश्यक मदत राज्य शासन करेल, असा शब्द त्यांनी दिला. राज्यातील नगर विकास विभागाच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी 21 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय जुन्या काळातील योजना पूर्ण करण्यासाठी आठ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. सध्या त्यापैकी 100 योजना पूर्ण झाल्या असून मार्चपर्यंत उर्वरित योजना पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन राहणाऱ्यांना त्या जागेचा पट्टा त्यांच्या नावावर करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच घरकुल योजनेत घरेही दिली जाणार आहेत. दोंडाईचा शहरासाठी मागेल तेवढ्या घरांना मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सन 2022 पर्यंत‘सर्वांना घरे’ या संकल्पानुसार राज्य शासन काम करीत असून दोंडाईचा मध्ये त्यासाठी मंत्री श्री. रावल यांनी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले.
दुष्काळी भागातील नागरिकांसाठी बीपीएल प्रमाणेच एपीएल शिधापत्रिका धारकांना गहू व तांदूळ देण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मागणी नोंदविल्याची माहिती श्री. फडवणीस यांनी दिली. राज्य शासनाने 31 ऑक्टोबर रोजी दुष्काळ घोषित केला त्यानंतर केंद्रीय पथकाने पाहणी केली. नुकतेच आपण केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांची भेट घेतली असून राज्य शासनाला केंद्रातून मोठ्या प्रमाणात मदत मिळेल, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात रोजगार हमी योजना मंत्री श्री. रावल यांनी नरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केली. विहिरी, कंपार्टमेंट बंडिंग, अशी कामे मोठ्या प्रमाणात झाली. सिंचन प्रकल्पांसाठी तसेच त्यासाठी निधी दिल्याचे ते म्हणाले. राज्यातील बारा बलुतेदारांसाठी ही विविध योजना कार्यान्वित करून त्यांच्या उद्योग- व्यवसायांना चालना दिली जाईल. कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिकाधिक पारंगत करण्याचे काम केले जाईल, असे ते म्हणाले. राज्य शासनाने कांदा पिकासाठी दोनशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. केंद्र शासनाने अधिक मदत दिली, तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली, जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी दोंडाईचा हे शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. दोंडाईचा येथे अपर तहसील कार्यालय कार्यन्वित झाले आहे. त्याच प्रमाणे कोषागार, उपनिबंधक कार्यालयासह विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सुलवाडे-जामफळ योजनेच्या भूसंपादनाला गती मिळावी, तसेच दोंडाईचा रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांना थांबा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी नगरपालिकेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमारतीची ठळक वैशिष्टे• रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकारली इमारत
• एकूण 31632 चौरस फुट बांधकाम असलेली तीन मजली इमारती
• भव्य असे अध्यक्ष दालन, उपाध्यक्ष दालन
• सभागृह, समिती सभागृह, सभापती दालन, विभाग निहाय दालने
• नागरी सुविधा केंद्र, स्वच्छता गृह, अग्निशमन व्यवस्था
• सीसीटीव्ही कॅमेरा व सुसज्ज अशी फर्निचर व्यवस्था
• सुमारे 4.80 कोटी खर्चाची भव्य इमारत