वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभारंभ सोहळयात दिलेला शब्द केला पूर्ण
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बांबु हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट या संस्थेच्या उदघाटन समारंभात अर्थ व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर युनिटला भेट देण्यास येणा-या लोकांसाठी, संशोधकांच्या प्रवासासाठी तसेच महिला कामगारांची ने-आण करण्यासाठी 25 सीटर बस बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली या संस्थेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
सदर आश्वासनाची पूर्तता झालेली असून बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली या संस्थेला आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 25 सीटर बस उपलब्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. नियोजन विभागाने दिनांक 29 नोव्हेंबर 2018 रोजी च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तत्संबंधाने सुचना दिल्या आहेत. दिनांक 14 सप्टेंबर 2018 रोजी विसापूर येथे बांबु हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट चा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला होता. या शुभारंभ सोहळयात वनमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली असून विशेषतः महिला कारागीरांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.