नागपूर/प्रतीनिधी:
राज्यातील 2 लाख 28 हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील 6 लाख 50 हजार शेतक-यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महावितरणतर्फ़े कामठी तालुक्यातील तरोडी आणि वडोदा तसेच कॉग्रेसनगर विभागातील खामला आणि बुटीबोरी विभागातील जामठा येथील 33/11 केव्हीए उपकेंद्रांचे लोकार्पण आणि नव्यानेच स्थानांतरित झालेल्या उमरेड विभागीय कार्यालयाचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते सोमवार (दि. 5 नोव्हेंबर) रोजी करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील चार उपकेंद्रांचे लोकार्पण करून जिल्ह्याला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपुर्ण केले आहे. तरोडी आणि वदोडा उपकेंद्राची उभारणी विहीत मुदतीदरम्यान केल्याबद्दल महावितरणच्या सर्व अधिका-यांचे आणि कर्मचा-यांचे अभिनंदन करतांना ऊर्जामंत्री यांनी शासन शेतक-यांच्या पाठीशी असून मागिल चार वर्षात विदर्भातील 7 लाख 58 हजार शेतक-यांच्या कृषीपंपांना वीजजोडण्या दिल्या असून उर्वरीत सर्व वीज जोडण्या डिसेंबर पर्यंत दिल्या जातील. राज्यातील 6 लाख 50 हजार शेतक-यांना मुख्यमंत्री सौर वाहीनीच्या माध्यमातुन आता दिवसाही मुबलक वीजपुरवठा उपलब्ध राहील, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तरोडी येथील वीज उपकेंद्रातून अडका, परसोडी, बिडगाव परिसरातील 2600 ग्राहकांना वीजपुरवठा होणार आहे. येथे 5 एमव्हीए क्षमतेची दोन पैकी एक रोहीत्र उभारण्यात आले असून दुसरे रोहित्र डिसेंबर महिन्यात कार्यरत होईल, अशी माहिती मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी यावेळी दिली,. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील सुमारे 4 हजार\ लाभार्थ्यांना याच उपकेंद्रातून आगामी काळात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तर वडोदा येथील वीज उपकेंद्रातून वडोदा, गुमथळा, पारडी परिसरातील 2600 वीज ग्राहकांना 6 वाहिन्यांव्दारे वीजपुरवठा. उभारणीवर 3 कोटी 41 कोटी रुपये खर्च झाला आहे. यातून एकूण 8 वाहिन्या काढण्यात आल्या असून त्यावरून सतराशे घरगुती, नऊशे कृषी आणि 14 सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाणे, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, नारायण आमझरे यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कॉग्रेसनगर विभागासाठी 100 कोटी
महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाचा विभाग बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी या विभागातील विकास कामासाठी 100 कोटींचा विशेष निधि मंजूर केला असून त्यात रस्त्यावरील वीज खंआंब हटविणे, वाहिन्या भुमिगत करणे, घरावरील वीज वाहिन्या काढ़णे आदी कामांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सुचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बुटीबोरी जामठा येथील नॅशनल कॅन्सर संस्थेच्या परिसरात आणि नागपूर शहरातील खामला उपकेंद्राच्या लोकार्पणाप्रसंगी केल्या. नागपूर शहराच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात एक हजार कोटींची विविध विकास कामे सुरु असून त्यात महावितरणसाठि 106 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. खामला उपकेंद्रातून 8 वाहिन्यांव्दारे टेलीकॉमनगर, दीनदयाल नगर, शास्त्री ले आऊट, सोमलवार निकालस शाळा, भेंडे लेआऊट, खामला, पांडे लेआऊट, चिंचभवन येथील 16500 वीज ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे. जामठा आणि खामला ही दोन्ही उपकेंद्रे आधुनिक जीआयएस तंत्रत्रानावर आधारीत आहेत. या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत अधिक क्षमतेचे उपकेंद्र कार्यान्वित करणे शक्य झाले आहे. या दोन्ही उपकेंद्राची कामे वेळेत पुर्ण केल्याबद्दल यावेळी ऊर्जामंत्र्यांनी महावितरण अधिकारी आणि कर्मचा-यांचे कौतूकही केले.
यावेळी महापौर नंदा जिचकार, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, मनिष वाठ, नगरसेवक मुन्ना यादव, दिलीप दिवे, वर्षा ठाकरे, प्रकाश कोचर, विशाखा बांते यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.