नागपूर/प्रतिनिधी:
डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना राष्ट्रीय झिरो माइल 'समाजरत्न' पुरस्कार प्रदान करतांना डॉ. सुधीर तारे, श्रीमती गीता जैन, ॲड. डी एम काळे, डॉ. समीर पालतेवार. |
महिला व बाल हक्क क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना झिरो माईल फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फ़े तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठीत राष्ट्रीय झिरो माइल 'समाजरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आले.
नागपूर जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य असलेल्या डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर ह्या मागिल अनेक वर्षांपासून महिला व बाल हक्क क्षेत्रात कार्यरत असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशिका आहेत. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीय महिलांवर होणा-या अत्याचाराची अनेक प्रकरणे यशस्वीरित्या हाताळली आहेत. याशिवाय अनेक वृत्तपत्रांतून महिला व बाल हक्कांविषयी नियमित लिखाण व अनेक सामाजिक तसेच शासकीय संस्थांमार्फ़त महिला व बाल कल्याण आणि त्यांचे हक्क याविषयी जनजागृतीचे कार्य निरंतरपणे चालविले आहे. त्यांच्या ‘एक्सप्लॉयटेशन ऑफ़ चिल्ड्रेन ॲन्ड ह्युमन राईट्स परस्पेक्टीव विथ स्पेशल रेफ़रन्स टू सेक्शूअल एक्सप्लॉयटेशन ऑफ़ चिल्ड्रेअन इन इंडीया’ या शोधप्रबंधाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवीही बहाल केली आहे. बालकामगार आणि मुलांवर होणा-या लैगिक शोषणाच्या अनेक प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधीत कायद्यातील त्रुट्या याशिवाय शासकीय योजना व त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचा टीकात्मक अभ्यास त्यांनी यात सादर केला आहे. ग्रामिण पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामिण जीवनरेखा अभियान, इंदीरा आवास योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, एकात्मिक वॉटरशेड व्यवस्थापन योजना, राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजना, पर्यावरण संतुलीत सम्रुद्ध ग्राम योजना यासारख्या राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील विविध मंत्रालये आणि विभागाच्या योजनांवर सामाजतज्ञ म्हणून नॅशनल लेवल मॉनिटर, संसाधन समन्वयक म्हणूनही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे.
नुकतेच नागपूर येथील हॉटेल हेरीटेज येथे झालेल्या झिरो माईल फ़ाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन ऍण्ड पार्लमेंट (अमेरिका) चे सदस्य डॉ. सुधीर तारे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रीमती गीता जैन, जेष्ठ अधिवक्ता ॲड. डी एम काळे, ज्येष्ठ न्यूरोलॉजिकल सर्जन डॉ. समीर पालतेवार यांच्या हस्ते डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी राज्यमंत्री आणि जेष्ठ नेते श्री दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर च्या महापौर श्रीमती नंदा जिचकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी सामाजिक, पर्यावरण, खेळ, आरोग्य, विज्ञान, कला, साहित्य, लेखन, पत्रकारिता आणि रोजगार याक्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या विविध राज्यातील व्यक्तींना गौरविण्यात आले.
यापुर्वीही डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फ़े ‘सामाजिक अभिसरण’ पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फ़े ‘ग्लोरी ऑफ़ वुमनहुड’ पुरस्कार, युनिव्हर्सिटी वुमेन्स असोसिएशन, नागपूर आणि इतरही अनेक सामाजिक संस्था आणि विभागांतर्फ़े त्यांच्या या कार्याची दखल घेत गौरविण्यात आले आहे.