महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा राज्याच्या विदयुत मंडळ अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली आहे. त्यांची निवड ही महावितरणच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतल्या जात असल्याची पावती आहे.
अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणुन डॉ. केळे यांनी आपल्या साडेचार महिन्याच्या कार्यकाळामध्ये वितरण पेट्यांची झाकणे लावण्याची मोहीम, स्वच्छता मोहीम, शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी शुद्धीकरण यंत्रणेचे (आर.वो.) कार्यान्वयन, लिफ्ट सुविधा, केंद्रीय देयक प्रणाली कार्यशाळा, एच.व्ही.डी.एस. योजनेच्या निविदा प्रकियेमध्ये गतिमानता, खेळाडूना प्रोत्साहन, परिमंडळाचे नाट्य प्रादेशिक स्पर्धेत प्रथम, ग्राहक जनमित्र व अधिका-यांसोबत थेट संवाद अशा अनेक आघाड्यांवर यश संपादीत केले. त्यांची निवड ही महावितरणच्या कार्याचा गौरव आहे, इतर राज्यामध्ये सेवा करण्याची संधी ही महावितरणमुळेच मिळत असून, ऊर्जा क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आता त्रिपुरा येथे सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी प्रयत्नरत राहू अशी ग्वाही डॉ. मुरहरी केळे यांनी दिली आहे.
पुर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता पदापासून अकोला परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी रुजू होण्यापूर्वी ते मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी येथे संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. नागपूर शहर मंडलाच्या अधीक्षक्पदी कार्यरत असतांना त्यांनी वीज वितरण क्षेत्रात नागपूर शहारात अनेक नवनवीन योजना यशस्वीपणे राबविल्या. याशिवाय तथा टोरॅट पॉवर, भिवंडी येथेही त्यांनी आपल्या विशेष कार्याची चुणूक दाखविली आहे. महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयात वितरण व वाणिज्यिक विभागात मुख्य अभियंता म्हणून त्यांचे कार्य कौतूकास्पद राहिले आहे. सोबतच कार्यकारी संचालक (मानव संसाधन) पदाचा प्रभार सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला आहे. वीज वितरण फ़्रॅन्चाइज़ी या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने त्यांना आचार्य पदवी बहाल केली असून वितरण फ़्रॅन्चाइज़ी विषयावरील त्यांच्या लेखनाचा वापर अनेक ठिकाणो संदर्भ आणि मार्गदर्शक म्हणून वापरल्या जात आहेत. एक यशस्वी अभियंता असलेले डॉ. मुरहरी केळे हे अनेक सामाजिक आणि साहित्यीक संस्थांशी प्रत्यक्ष निगडीत असून त्यांनी मराठी चित्रपटात अभिनय सुद्धा केला आहे. डॉ. केळे यांची ५ मराठी व २ इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर अनेक रिसर्च पेपर्सही प्रसिध्द झाली आहेत, यात प्रामुख्याने हॉवर्ड विद्यापीठ बोस्टन येथे ‘स्मार्ट मीटर’ या विषयावरील पेपरचा समावेश आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. केळे यांचे अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून विविध विषयांवर शंभरहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मध्य प्रदेश शासनातर्फ़े ई-गव्हर्नन्स पुरस्कार, इंडीयन चेंबर ऑफ़ कॉमर्सतर्फ़े परफ़ोर्मन्स इम्र्पूवमेंट, मराठवाडा विकास संघातर्फ़े मराठवाडा भुषण पुरस्कारासमवेत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.