मूल/प्रतिनिधी
ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या संगणक परीचालकानां महाराष्ट्र राज्य आय टी महामंडळाकडून नियूक्ती मिळण्याच्या मागणीला घेऊन येत्या 27 नोव्हेंबरला मुंबई येथील विधीमंडळाच्या अधिवेशनात मोर्चा नेण्यात येत आहे. या मोर्चात चंद्रपूर जिल्हयातील 600 संगणक परिचालक सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे चंद्रपूर जिल्हा सचिव धनराज रामटेके यांनी दिले. मागील 7 वर्षा पासून महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून 2011पासून संग्राम (संगणीक्रूत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्राम पंचायती,पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालक म्हणून हजारो बेरोजगार तरुण डिजिटल महाराष्ट्राचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. परंतु शासनाने सदर प्रकल्पासाठी नेमलेल्या एजेसी कडून संगणक परीचालकाचे आर्थीक आणि मानसिक शोषण होत आहे. काम करून ही चार-चार महिने मानधन दिले जात नाही. शासनाने ठरवून दिलेल्या मानधनापेक्षा कमी मानधन दिले जाते. या विरोधात अनेकदा आंदोलने करण्यात आले.मात्र दरवेळेस आश्वासने देऊन आमचे आंदोलन दडपल्या जात आहे. 27 नोव्हेंबरच्या आंदोलनात जिल्हयातील 600आणि संपूर्ण राज्यातील हजारो संगणक परिचालक सहभागी होणार आहे. आम्हाला महाराष्ट्र राज्य आय टी महामंडळाकडून नियुक्ती पत्र देण्यात यावे ही मागणी केली जाणार आहे. या आंदोलनात जिल्हयातील सर्व संगणक परीचालकानी सहभागी होण्याचे आवाहन रामटेके यांनी केले आहे.