- विजय बारसे यांच्या चरित्रावर आधारित हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबरमध्ये सुरुवात
- नागपूरच्या कलावंतांनाही बिग बी सोबत अभिनयाची संधी
नागपूर - ‘सैराट’ चित्रपटानंतर हिंदीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो संपल्यानंतर आणि अमिताभ यांचा बहुप्रतीक्षित ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते ‘झुंड’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोमवारी नागपुरात दिली.
दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता अमिताभ बच्चन ही जोडी हिंदीच्या रुपेरी पडद्यावर काय कमाल दाखवणार, याबद्दल अगदी इंडस्ट्रीसह सर्वसामान्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमिताभ बच्चन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार असल्याचे मंजुळे यांनी स्पष्ट केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट विजय बारसे यांच्या चरित्रावर आधारित आहे. बारसे यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन त्यांची टीम तयार केली होती. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे बारसेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी एकूण ७० ते ८० दिवस चित्रीकरणाला लागणार असून त्यासाठी सलग ४५ दिवस अमिताभ बच्चन चित्रीकरण करणार आहेत.
या चित्रपटासाठी मंजुळे यांनी निवडलेल्या मुलांना रीतसर अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले असून ते आता एखाद्या नटासारखे काम करणार आहेत, अशी माहिती मंजुळे यांनी दिली. झुंडचे चित्रीकरण आता नागपूरमध्ये होणार आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अशा वेगळ्या चित्रपटासाठी काम करणे हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. मी नेहमीच नवख्या कलाकारांबरोबर काम करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी हे नवीन तरुण कलाकार आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखा दिग्गज कलाकार हे अफलातून मिश्रण पडद्यावर प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देणारे ठरेल, असा विश्वासही नागराज यांनी व्यक्त केला.