সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 02, 2014

कर्तव्य भावनेतून शंभर टक्के मतदान करा - डॉ. दिपक म्हैसेकर

चंद्रपूर : लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार नागरिक व युवकांनी कर्तव्य भावनेने वापरुन शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी व सरदार पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रम सरदार पटेल महाविद्यालयात घेण्यात आला, त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. उपविभागीय अधिकारी संजय दैने, तहसिलदार गणेश शिंदे, उपप्राचार्य डॉ. एल.डी. शेंडे व डॉ. आर.पी. इंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने देशभर अभियान सुरु केले असून या अभियानाचा भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मतदान वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 1 जानेवारी 2014 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण तरुणींना 10 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात सहभागी होता येईल. मतदान करणे हा आपला अधिकार असून तो प्रत्येकाने बजावावा, असेही त्यांनी सांगितले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 58.59 टक्के मतदान झाले होते. 10 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत ही टक्केवारी 80 टक्क्यांवर जावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मतदान वाढविण्यासाठी डॉक्टर व वकील यांची बैठक घेऊन त्यांना आवाहन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्यांचे नाव यादीत आहे त्यांना मतदान करता येईल, परंतु ज्यांचे नाव यादीत नाही अशा तरुण तरुणींना आपले कुटुंबीय, शेजारी व परिचित यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाने मतदानाची वेळ एक तासाने वाढविली असून आता सकाळी 7 ते 6 या वेळेत मतदान करता येईल. या निवडणुकीत प्रथमच आयोगाने नोटा (यापैकी पसंत नाही) हा पर्याय उपलब्ध करुन दिला असून हा शेवटचा पर्याय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली.

श्री. दैने म्हणाले, सर्वांचे मत महत्त्वाचे असून हा अधिकार आपण जाणीवपूर्वक वापरला पाहिजे. जास्तीत जास्त मतदान होणे हे लोकशाहीच्या हिताचे असून मतदानाचा अधिकार वापरलाच पाहिजे असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. मतदानाच्या दिवशी सहलीवर न जाता आधी मतदान करावे, असे आवाहनही श्री. दैने यांनी केले.

मतदानाचा अधिकार हा घटनेने दिलेला सर्वोच्च अधिकार असून मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे व ते बजावावे, असे आवाहन डॉ. शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.आर.पी. इंगोले यांनी मानले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.