आपलं सरकार
बोल बच्चन @ देवनाथ गंडाटे
----------------------------
एका चित्रपटाच्या अनुषंगाने एक दिग्दर्शक निर्मात्याला काही नायक-नायिका हव्या होत्या. त्यासाठी तो ड्रीमगर्ल हेमामालिनीकडे गेला. मॅडम, आपलं सरकार चित्रपटासाठी आपण भूमिका कराल काय? अशी विचारणा केली. मात्र, हेमाजींनी नकार देत, अभी तो मेरे पास टाईम नही, मोदीजीको पीएम बनाना है. निराश झालेल्या दिग्दर्शकाने मग, दिपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीची भेट घेतली. चित्रपटाचे कथानक सांगितले. ऐकून ती भारावली. दिग्दर्शकही खूश झाला अन मन मे लड्डू फूटा. पण, झाले ते उलटे. दिपालीने आम आदमी पक्षाच्या तिकिटावर नगरची उमेदवारी मिळविली. निराश झालेल्या दिग्दर्शकाने फोन करून दिपालीला विचारले. का हो मॅडम. तुम्ही तर होकार दिला होता ना. मग, काय झाले?. त्यावर ती म्हणाली, तुम्हीच तर म्हणाले आपलं सरकारमध्ये काम करा. मग, सरकार बनण्यापूर्वी खासदार बनायला नको. हिरमुसल्या मनानं परतलेल्या दिग्दर्शकानं अभिनेत्रींचा नाद सोडला आणि अभिनेत्यांना शोधणे सुरू केले. परेश रावल यांची भेट घेतली. सारं समजावून सांगितलं. दोन दिवसांत कळवितो, असे रावल बोलले. पण, दुस-याच दिवशी वृत्तपत्रात परेश रावल भाजपचे उमेदवार म्हणून बातमी झळकली. दिग्दर्शकाने ओ मॉय गाड म्हणत डो्क्यावर हात ठेवला. पुढे, महेश मांजरेकर यांच्याकडे विनवणी सुरू केली. पण, काही फायदा झाला नाही. त्यांनीही मनसेच्या उमेदवारीत व्यस्त असल्याचे सांगत डॉ. कोल्हेंकडे जाण्याचा सल्ला दिला. बंगल्यातून चहा-पाण्याविना परतलेल्या दिग्दर्शकाने त्यांची जागा डॉ. अमोल कोल्हे भरून काढतील, या आशेनं त्यांच्याकडे गेले. पण, बघतात तर काय त्यांनी हातात शिवधनुष्य घेतला होता. शेवटचा पर्याय नंदू माधव होते. त्यांनी होकार दिला. हरकत नाही, असे सांगत त्यांनीही दिपाली सय्यदचा किस्सा गिरविला. आपलं सरकार आणू. पण आधी लोकसभा जिंकू. मग, या दिग्दर्शकाने राखी सावंतला गाठले. पण, तिची भाषाच निराळी. का, कशासाठी? असे टर्रकविणारे प्रश्न करीत राहील. आपलं सरकार ना. नक्कीच साकार करू. पण, ते राष्ट्रीय आम पक्षाच्या तिकिटावर. तिच्यापुढे काय बोलावे, तिला कसं समजवावं, हे त्या दिग्दर्शकाच्या नाकीनऊ आले होते. पण, ती हट्टी आणि जिद्दी स्वभावाची. या देशात दोनच गोष्टी मोठ्या. एक मीडिया आणि मी (राखी), अशी ती बडबडत होती. एक नंबरची ऑयटमबाज ही राखी एकदिवस दिल्लीतही गेली होती. मै दिल्ली की चाय पिने आयी हू, अशी जोराजोरानं ओरडत कमळाचं फूल मागत होती. काय म्हणावं या पोरीला.
या राजकारणामुळे वैतागलेल्या दिग्दर्शकानेही आपलं सरकार या चित्रपटाचा नाद सोडलाय म्हणे. पण, या अभिनेत्यांच्या डो्नयातील राजकारणाचं भूत उतरल्यावर चित्रपटाचे चित्रिकरण करणार असल्याचे समजते.