महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्तुत्य उपक्रम
कोराडी १ एप्रिल - मागील वर्षी १४ एप्रिल २०१७ ला मा.पंतप्रधानांच्या हस्ते कोराडी येथील सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित ६६० मेगावाटच्या तीन संचांचे लोकार्पण झाले व त्यानंतर महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता श्री. अभय हरणे व चमूने पर्यावरणीय मानकांवर विशेष लक्ष केंद्रित केले. सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानामुळे कोळसा,तेल,रासायनिक पदार्थ यामध्ये बचत झाली. विशेष म्हणजे, पर्यावरणीय विश्लेषण, औष्णिक वीज केंद्रविषयक राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन, वृक्षलागवड इत्यादी अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कोराडी वीज केंद्रातील वायू उत्सर्जनाचे नियमित नमुने घेण्यात येतात त्या नमुन्यांच्या तपासणीनुसार कोराडी वीज केंद्राला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ५ स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्रासोबतच खापरखेडा वीज केंद्रातील ५०० मेगावाट संच क्रमांक पाच ला ५ स्टार रेटिंग तर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला ४ स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. नुकतेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर येथील उद्योग भवन येथे आयोजित कार्यक्रमात महानिर्मितीच्या कोराडी,खापरखेडा व चंद्रपूर वीज केंद्राला सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील उद्योगांच्या वायू उत्सर्जनाबाबत ‘स्टार रेटिंग’ उपक्रम सुरु केला असून यामध्ये अधिक वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना १ स्टार तर कमी वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना ५ स्टार देण्यात येत असल्याने उद्योगांना पर्यावरणविषयक मानकांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये १ स्टार म्हणजे किमान २५० मिलीग्राम/एन.एम.क्यूब, २ स्टार म्हणजे १५० ते २५० मिलीग्राम/एन.एम.क्यूब, ३ स्टार म्हणजे १०० ते १५० मिलीग्राम/एन.एम.क्यूब, ४ स्टार म्हणजे ५० ते १००मिलीग्राम/एन.एम.क्यूब, ५ स्टार म्हणजे ० ते ५० मिलीग्राम/एन.एम.क्यूब असे मापके आहेत.
विकास हवा असल्यास उद्योग पाहिजे व उद्योग आल्यास रोजगाराच्या संधी व काही प्रमाणात प्रदूषण होणे स्वाभाविक आहे, मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाने घालून दिलेल्या निकषांचे पालन करणे हे प्रत्येक उद्योगाला बंधनकारक आहे. जागतिक पातळीवर ‘स्टार रेटिंग’ सारखे अनेक उपक्रम सुरु असले तरी वायु उत्सर्जन थेट परिणामाबाबतचा ‘स्टार रेटिंग’ हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. स्टार रेटिंग’सारख्या उपक्रमामुळे हवेचे प्रदूषण आवाक्यात येण्यात मोठा हातभार लागणार आहे.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक राजू बुरडे यांनी कोराडी, खापरखेडा व चंद्रपूरचे मुख्य अभियंते अनुक्रमे अभय हरणे, राजेश पाटील आणि जयंत बोबडे तसेच येथे कार्यरत असलेले अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, पर्यावरण विभाग,केमिस्टवर्ग तसेच मुख्य महाव्यवस्थापक(पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा) डॉ.नितीन वाघ यांचे विशेष अभिनंदन केले आहे.