महावितरण भरणार अतिरिक्त सुविधा शुल्क

वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या महावितरणने आता भीम अँप आणि डेबिट कार्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ५०० रुपयांपेक्षा अधिकच्या वीजबिलाचा भीम अँप आणि डेबिट कार्डद्वारे भरणा करणाऱ्या ग्राहकांना जवळपास पाऊण ते एक टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागत होते. आता हे अतिरिक्त शुल्क महावितरण भरणार असून ग्राहकांना केवळ वीजबिलाची रक्कम भरावी लागणार आहे. या सुविधेचा अधिकाधिक ग्राहकांना लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता रफिक शेख यांनी केले आहे.
यापूर्वी डेबिट कार्डद्वारे पाचशे रुपयांपर्यंतचा वीजबिल भरणा सुविधा शुल्काशिवाय होत असे. तर डेबिट कार्डद्वारे भरणा होणाऱ्या पाचशे ते दोन हजार रुपयांच्या वीजबिलासाठी ०.६ टक्के आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे जवळपास ०.७१ टक्के तर दोन हजारपेक्षा अधिकच्या बिलासाठी ०.८२ टक्के व त्यावर १८ टक्के जीएसटी असे सुमारे ०.९७ टक्के सुविधा शुल्क आकारले जात. वीजबिलाच्या एकूण रकमेच्या पाऊण ते एक टक्का असलेले हे सुविधा शुल्क आता महावितरणकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे डेबिट कार्डद्वारे वीजबिलाचा भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांवर अतिरिक्त सुविधा शुल्काचा बोझा पडणार नाही. असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.