সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 23, 2018

महानिर्मितीच्या हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ३००० नागरिकांचा सहभाग

कोराडीत साकारलं मामाचं गाव;मराठमोळ्या संस्कृतिचं घडलं दर्शन 
नागपूर/प्रतिनिधी:उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्या कि मामाच्या गावाला जाऊन धमाल मस्ती करायची,गावाकडील निसर्गरम्य मातीशी नातं जोडीत, नात्यांची वीण अधिक घट्ट करायची अशी आपली मराठी संस्कृती. मात्र धकाधकीच्या जीवनात हि जागा टी.व्ही.,मोबाईल, फेसबुक,व्होट्सअप सारख्या आभासी दुनियेने व्यापल्याने जीवनाचा खरा-खुरा आनंदच दूर झाला, मानवी जीवन तांत्रिक झाले व यातून उदयास आलेली संकल्पना म्हणजे "हॅप्पी स्ट्रीट". मामाच्या गावाला न जाता सुटीच्या दिवशी सकाळच्या प्रहरी मुख्य रस्त्यावरील रहदारी काही वेळापुरता बंद करून त्याठिकाणी मनसोक्त खेळ, धमाल मस्ती करायची हा यामागचा उद्देश. 
महानिर्मितीच्या कोराडी येथील सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या ६६० मेगावाट क्षमतेच्या तीन संचांच्या राष्ट्रार्पण समारंभ प्रथम वर्षपूर्ती निमित्ताने कोराडी विद्युत विहार वसाहतीतील मुख्य रस्त्यावर "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमाचे नुकतेच भव्य आयोजन करण्यात आले.  महानिर्मितीच्या राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीयांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः कोराडी, खापरखेडा,चंद्रपूर, पारस,भुसावळ, नाशिक, परळी व मुंबई मुख्यालयातील अश्या सुमारे ३००० व्यक्तींनी या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आनंद घेतला. हिरव्यागार वृक्षांच्या सावलीत, रंगबिरंगी फुगे,झेंडे, तोरणे, टोप्या,छत्र्या, कागदी फुलांनी रस्त्याला सजविण्यात आले होते. सोबतीला चार्ली चॅपलीन, छोटा भीम आणि छुटकी कार्टून्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. वयाचे भान विसरून, आपलं-परकं विसरून, प्रत्येकाने बालपणीच्या खेळाचा निखळ आनंद लुटला. नेहमी चारचाकी चालविणारा बैलबंडी चालवीत होता तर माता-भगिनी आपल्या मुलांना विसरून लगोरी,दोरीवरच्या उड्या इत्यादींचा मनसोक्त आनंद घेत होत्या. तीन साडेतीन तास कसे संपले कोणालाच कळाले नाही. घराकडे परतीची पाउले वळायला तयार नव्हती एवढा जीव "हॅप्पी स्ट्रीट" ने लावला. एरवी घरात बोलायला वेळ नसणारी पालक मंडळी "हॅप्पी स्ट्रीट" वर एकमेकांशी खुलून बोलताना दिसली तर मुले-मुली देखील आपले आई-वडील टायर, लोखंडी रिंग चालवीत धावत असल्याचे पाहून आश्चर्य चकित झाले. अनेकांनी गाणे म्हणून आपले गळे साफ केले. जात,पात,धर्म,वय,पद, गर्व दूर सारून प्रत्येक व्यक्ती स्वत:ला व्यक्त करीत निस्वार्थपणे सहभागी झाल्याचे दिसून येत होते. "हॅप्पी स्ट्रीट" च्या माध्यमातून अख्ख मामाचं गावच कोराडीत साकारण्यात आले होते.
विशेष म्हणजे, राज्याचे उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती लाभली. अखंडित वीज उत्पादनाचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी "हॅप्पी स्ट्रीट" हा उत्तम पर्याय असल्याचे नामदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. याप्रसंगी त्यांनी "चलते-चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहेना" या गीताच्या काही ओळी सादर केल्या. 
या कौटुंबिक कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला त्याचे कारण लहान मुला-मुलींसाठी चेहऱ्याचे मास्क, बक्षिसे, बुढ्ढी का बाल(सुगर कँन्डी),कागदी फुले(ओरेगामी) प्रशिक्षण,जादूचे प्रयोग, रिंग टोस, बंदुकीच्या गोळीने फुगे फोडणे,दोरीचे झुले,बैलगाडी,गाय,बैल,वासरू,उंट,बॉल गेम्स, टायर, लोखंडी रिंग चालविणे, दोरीवरच्या उड्या,लहान सायकल, स्केटिंग, चित्रकला तर तरुणी व महिलांसाठी मेहंदी, टॅटू,बॅडमिंटन,फुटबॉल,लगोरी,दोरीवरच्या उड्या,बास्केटबॉल,कंबर रिंग, प्लेट थ्रो, रबर रिंग,रेखाचित्र, पुरुष वर्गासाठी फुटबॉल, बास्केटबॉल, दोरीवरच्या उड्या,प्लेट थ्रो, बॅडमिंटन, रेखाचित्र, कार्टून्स, लाइव कार्टून्स,कंचे,भौरे. फूड झोनमध्ये इंडियन कॉफी हाउसचे खाद्यपदार्थ, शबाना बेकरीचे प्रोडकट्स,दिनशा आईस्क्रीम,समोसा,चहा,पाणी, नारळपाणी, ताक,पन्हे, असे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासन,बुद्धिबळ, कॅरम, वृत्तपत्र,मासिके वाचन व संगीत तर मुख्य स्टेजवर डी.जे.संगीत, रेडीओ जोकीची धमाल कॉमेंट्री,डान्स थरार तर  दुसऱ्या मंचावर प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी ज्यामध्ये गाणे,नृत्य,मिमिक्री, कविता, वाद्य वाजविणे इत्यादी कला अनेकांनी  सादर केल्या.  
कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे व राजकुमार तासकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम महाजेनको कोराडी चमूच्या सहकार्याने "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या संपन्न झाला.  कार्यक्रमाला महानिर्मितीचे मुख्य अभियंते अनंत देवतारे, सुनील आसमवार,विवेक रोकडे,  मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, कोराडी-खापरखेडा,नागपूर-परळी-चंद्रपूर  औष्णिक विद्युत केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, विभाग प्रमुख, अधिकारी,अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी व  कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेत "हॅप्पी स्ट्रीट" कोराडी आयोजन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली.

 






শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.