সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 02, 2015

मुख्यमंत्री गावांना अचानक भेट देणार

खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक नागपूर जिल्हयातील कोणत्याही गावांना भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी करतील. या भेटीत त्या गावात कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, पटवारी गावात नसल्यास त्यांचेवर कडक कार्यवाही करण्यात येईल असा ईशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.


बोगस बी-बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करणार

पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे - खरीप हंगाम आढावा बैठक


नागपूर,दि. 2 : खरीप हंगामाच्या 2015-16 या वर्षाच्या कार्यक्रमाचे नियोजन करतांना बोगस बी-बियाणांची विक्री होणार नाही याची काळजी प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी. अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज खरीप हंगाम आढावा सभेत केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात 2014-15 कृषी उत्पादन आढावा व 2015-16 खरीप कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे होते. तसेच खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, सुधीर पारवे, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, कृषी सभापती श्रीमती आशा गायकवाड व जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. विजय घावटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष मोहरील प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हयातील पिकांची उत्पादकता वाढविण्यावर अधिक लक्ष देण्यात यावे. यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या गावांचा पीक आराखडा येत्या दोन दिवसात तयार करुन जिल्हाधिकारी यांना सादर करावा. यासाठी ग्रामसभा घ्याव्यात, शेतकऱ्यांशी चर्चा करावी, या कामात हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या सभेत दिले.

पीक कर्जापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी कार्य योजना आखावी. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज पुरवठा करण्याची कार्यवाही सुरु असून येत्या 30 मे पर्यंत ती पूर्ण करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न चालू असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी रब्बी हंगामात पीक क्षेत्र वाढविणे व खरीप हंगामात पीकाची उत्पादकता वाढविणे यावर विशेष लक्ष देण्यात येईल. याशिवाय शेतकऱ्यांच्या विहिरीना वीज जोडण्या देण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात येईल असे सांगितले.

जिल्हयातील पिकाखालील निवड पेरणी क्षेत्र 4 लाख 70 हजार हेक्टर आहे. सिंचनाखालील क्षेत्र 1 लाख 49 हजार हेक्टर, सर्वसाधारण खरीप क्षेत्र 4 लाख 83 हजार 360 हेक्टर आहे. रब्बी क्षेत्र 1 लाख 44 हजार 100 हेक्टर आहे. सर्वसाधारण उन्हाळी क्षेत्र 1200 हेक्टर आहे. सन 2014-15 मध्ये खरीप ज्वारी 4 हजार 314 हेक्टर, भात 82 हजार 901 हेक्टर, मका 1025 हेक्टर, सोयाबीन 1 लाख 44 हजार 523 हेक्टर, भुईमुग 2570 हेक्टर, तुर 4 लाख 57 हजार हेक्टर, मुग 1394 हेक्टर, उडीद 1112 हेक्टर तर कापूस 1 लाख 92 हजार 519 हेक्टर क्षेत्रात होते. यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन पीकाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेण्यात यावे अशी सूचना आमदारांनी केली.

येत्या 15 मे पासून प्रत्येक गावात तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पटवारी यांनी सायंकाळी 6 ते 8 यावेळेत जाऊन जलयुक्त शिवार अभियान, राज्य व केंद्र शासनाच्या कृषी योजना सांगून गावाचे नियोजन करावे. पीकांची उत्पादकता दुप्पट करण्यासाठी पेरणी पध्दतीची माहिती द्यावी. असेही या सभेत सांगण्यात आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.