चंद्रपूर :शुक्रवार, ०१ मे, २०१५
आजचा दिवस हा संकल्प दिवस असून गेल्या सहा महिन्यात युती सरकारने गोरगरीबांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणत रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करु या, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोलीस कवायत मैदान येथे आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जी.पी.गरड, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ-ठुबे आदी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार, दारिद्रय रेषेखालील विविध घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वत:ची जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणारी अभिनव पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नुकतीच अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला रु.50 हजार पर्यंत घरकुलासाठी जागा खरेदी करण्याकरिता आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकांचा विकास तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी गोंदोडा ता. चिमुर जि. चंद्रपूर या स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देणारे वैद्यकीय महाविद्यालय जुलै 2015 या सत्रापासून सुरु करण्याचा राज्य शासनाचा ठाम निर्धार आहे. आपल्याला दारुबंदीकडून व्यसनमुक्तीकडे वाटचाल करावयाची आहे, असे सांगून व्यसनमुक्त जिल्हा हे आपले स्वप्न असून यासाठी नागरिक व तरुण वर्गाच्या सहकार्याची गरज असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी जलयुक्त शिवार प्रचार रथाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी विविध पुरस्कार प्राप्त अधिकारी-कर्मचारी व खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.