चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने उभारलेल्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी होणार असून अशा प्रकारच्या लॅब प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यासाठी 18 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सोशल मीडिया लॅब व मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राजु भूजबळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया नियंत्रित करण्यासाठी सोशल मीडिया लॅब उभारण्यात आली आहे. अत्याधुनिक अशा लॅब मध्ये 2 सर्व्हर, 8 संगणक, 3 लॅपटॅब व 2 टॅब अशी यंत्रणा आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या लॅबमध्ये काम केले जाणार आहे. या ठिकाणी सोशल मीडिया पोस्ट, बातम्या, व्हिडीओ यांचे विश्लेषण करण्याची सोय आहे.
फेसबुक, व्हाट्ॲप, युट्युब, व्टिटर अशा एकूण 18 प्लॅटफार्म व 100 संकेतस्थळाचे नियंत्रण करण्याची व्यवस्था लॅबमध्ये आहे. त्याचप्रमाणे लोकेशन, 32 भाषा, 25 आंतरराष्ट्रीय भाषा आदीचे विश्लेषण करणारे साफ्टवेअर या लॅबमध्ये आहे. 24 तास ही लॅब काम करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सादरीकरण करुन सोशल मिडीया लॅब व मोबाईल सिसीटीव्ही कॅमेरा व्हॅन कशा प्रकारे कार्य करणार आहे हे सांगितले.
8 कॅमेरे, एक सर्व्हर, एक पिटीझेड कॅमेरा असलेल्या मोबाईल सिसीटीव्ही व्हॅनव्दारे गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवण्याचे काम केले जाणार आहे. अतिशय सुसज्य व आधुनिक अशी ही देशातील एकमेव मोबाईल सिसीटीव्ही व्हॅन आहे. दिल्ली, हैद्राबाद व मुंबई येथे अशा व्हॅन आहेत. मात्र चंद्रपूरची व्हॅन त्यापेक्षा जास्त आधुनिक आहे. मोठ्या सभा, गर्दीचे ठिकाणे, दंगलीची घटणा अशा ठिकाणी दुरवरुन चित्रीकरण करण्याची सोय या व्हॅनमध्ये आहे. सोबतच मोबाईल व्दारे व्हिडीओ पाठविण्याची सोय या व्हॅनमध्ये आहे. या व्हॅनमुळे चंद्रपूर पोलीस हायटेक झाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.