
विधान परिषदेसाठी चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.तर चंद्रपूर - वर्धा - गडचिरोली याच मतदारसंघासाठी काँग्रेसकडून वर्धेचे माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ यांना उमेदवारी देण्यात आली.
सध्या भाजपचे मितेश भांगडिया या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी पुन्हा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंबटकर यांच्यासह अरुण लखानी, सुधीर दिवे यांची नावे चर्चेत आली होती. तोडीसतोड लढत देण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोघेही एकामेकांच्या उमेदवाराची प्रतीक्षा करीत होते.एका निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने भाजपचे उत्साह संचारला आहे.
रामदास आंबटकर मूळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील अधिकारी होते. मात्र, संघावर बंदी घातल्याने त्याविरोधात आंदोलन उडी घेतली होती. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरी गमवावी लागली. तेव्हापासून त्यांनी उर्वरित संपूर्ण आयुष्य संघ कार्यासाठी वाहून घेतले. रामदास आंबटकर हेसुद्धा सुमारे ३५ वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. अनेक वर्षे पूर्व विदर्भाचे संघटन सचिव होते. त्यानंतर २००४ ते १५ या काळात भाजपचे संघटन सचिव होते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना भाजपने सरचिटणीस केले. आता त्यांना विधान परिषदेत पाठविण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही आंबटकरांच्या नावाला पसंती दिल्याचे कळते.