
एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथे उघडकीस आली. अजय प्रकाश मंगाम (२६) रा. सादागड ता. सावली, पूजा मुर्लीधर टेकाम (२४) रा. बोर्डा ता. चंद्रपूर असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
येत्या ५ जून रोजी पूजाचे लग्न ठरले होते. अजय एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता. पूजाच्या घराशेजारी अजयचा मामा अनिल कुंभरे हा वास्तव्यास आहे. अजयचे आपल्या मामाच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. अशातच त्याची पूजाशी ओळख झाली. नंतर भेटीगाठी वाढल्या. दोघेही एकमेकांना भेटून भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होती. त्यांनी प्रेमात आणाभाकाही घेतल्याचे समजते. या प्रेमाची चुणुक घरच्या मंडळींना लागली. मात्र त्यांना या दोघांच्या प्रेमाला विरोध होता.अशातच पूजाच्या वडिलाने तिच्यासाठी स्थळ शोधून तिचे लग्न ठरविले. ५ जून अशी लग्नाची तारीख निश्चित झाली होती. मात्र त्यांचे चोरून भेटणे सुरूच होते. अशातच १६ मेपासून ते दोघेही अचानक बेपत्ता झाले.अशातच आज सकाळी बोर्डा येथीलच एका विहिरीत या प्रेमीयुगालाचे मृतदेह तरंगताना आढळले. घटनेची माहिती होताच चिचपल्ली पोलीस चौकीचे राजू मडावी व रामनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारीसुद्धा घटनास्थळवर पोहचले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविले. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. यावरून १६ मे रोजीच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत.