गडचिरोलीत ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहिम उघडली आहे. निष्पाप आदिवासींची हत्या करणाऱ्या पाच जहाल नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी १ कोटी ७१ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यात एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच वर्तमानपत्रांना जाहिराती देऊन गडचिरोली पोलिसांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे.
पोलीस अधिकारी आणि सी-६० च्या जवानांनी गडचिरोलीत नुकत्याच केलेल्या कारवाईत ३९ नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांचं मनोबल वाढल्याने पोलिसांनी थेट जाहिराती देऊनच नक्षलवाद्यांच्या टॉप पाच कमांडरला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी या नक्षलवाद्यांच्या फोटोसह सर्व वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत. 'द्या माहिती, व्हा लखपती' अशा मथळ्याखाली या जाहिराती देण्यात आल्या आहेत.
या जाहिरातीत मल्लोजुल्ला वेणुगोपाल ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू ऊर्फ लच्छन्ना अभय याच्यावर ६० लाख, दीपक ऊर्फ मिलिंद ऊर्फ सह्याद्री तेलतुंबडे याच्यावर ५० लाख, नर्मदाक्का ऊर्फ उषाराणी किरणकुमार हिच्यावर २५ लाख, जोगन्ना ऊर्फ चिमाला नरसय्या याच्यावर २० लाख तर पहाडसिंग ऊर्फ अशोक ऊर्फ बाबुराव तोफा याच्यावर १६ लाखाचं बक्षीस जाहिर करण्यात आलं आहे. हे सर्वजण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगडमधील आहेत. हे पाचही जण जहाल नक्षलवादी आहेत. त्यांनी गडचिरोलीत अनेक आदिवासींची हत्या केली असून त्यांचा घातापाती कारवायांमध्येही सहभाग असल्याचं पोलिसांनी जाहिरातीत म्हटलं आहे. या नक्षलवाद्यांना अटक केल्यास किंवा त्यांना जीवे मारले तरीही बक्षीस दिले जाणार असून संबंधितांचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी या जाहिरातीत स्पष्ट केलं आहे. ०७१३२-२२२३४८, ९४२१६९९८०८, ७२१८८७८१७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गडचिरोली पोलिसांनी केलं आहे.